दुर्देवी ! पोलिस उपनिरीक्षकाचा 54 व्या वर्षी कोरोनामुळं मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   मुंबई पोलीस दलातील आणखी एका पोलीस कर्मचा-याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक मोहन दगडे (वय 54) यांचे रविवारी (दि.11) रात्री उशिरा निधन झाले. त्यांच्या निधनाने मुंबई पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

वाकोला पोलीस ठाण्यात दगडे हे पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत होते. दगडे यांना 4 एप्रिल रोजी कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना बीकेसी जम्बो कोव्हिड सेंटर येथे दाखल केले होते. गेल्या सात ते आठ दिवसांपासून ते कोरोनाशी झुंज देत होते. मध्यंतरी उपचारादरम्यान त्यांची तब्येत सुधारत होती. मात्र गेल्या दोन दिवसात त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. अखेर रविवारी रात्री उशिरा त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दगडे यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. दगडे यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.