मुंबई पोलीसांच मोठं पाऊल ? धनंजय मुंडेंसह आरोप करणाऱ्या महिलेचाही जबाब नोंदवणार?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर भाजपा आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे आणि किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशाराही भाजपा महिला मोर्चाच्या उमा खापरे यांनी दिला आहे.

या प्रकरणावरून मुंबई पोलिसांनी महत्वाची माहिती दिली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेचा १-२ दिवसांत मुंबई पोलीस जबाब नोंदवणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच धनंजय मुंडे यांचा देखील जबाब मुंबई पोलीस नोंदवणार आहे. या प्रकरणी दोघांचाही जबाब नोंदवल्यानंतर कारवाई संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. धनंजय मुंडे यांच्याविरुद्धच्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीवर ओशिवरा पोलिस एफआयआर नोंदवून घेत नसल्याचा आक्षेप तक्रारदार महिलेचे वकील अ‍ॅड. रमेश त्रिपाठी यांनी घेतला आहे. ‘बलात्कार, लैंगिक अत्याचारासारखे गंभीर गुन्हे व अन्य दखलपात्र गुन्ह्यांच्या प्रकरणांत तक्रार येताच एफआयआर नोंदवणे, हे पोलिसांना बंधनकारक आहे. आधी एफआयआर नोंदवा आणि नंतर चौकशी करा, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत, अशी माहिती दिली.

धनंजय मुंडे यांनी बुधवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्वतंत्रपणे भेट घेत त्यांची बाजू मांडली. तसेच धनंजय मुंडे मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीस मुंडे उपस्थित होते. मंत्रिपदाचा राजीनामा देण्याबाबत धनंजय मुंडे द्विधा मन:स्थितीत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. शेवटी, शरद पवार त्यांना काय आदेश देतात, यावरच सगळे अवलंबून असेल, असे मानले जाते. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची शक्यता फेटाळली आहे. तसेच या प्रकरणावरून द्विभार्या प्रतिबंधक कायदा धनंजय मुंडेंच्या प्रकरणात लागू होऊ शकत नाही. मुस्लिम ४-४ लग्न करतात, तर एखाद्या हिंदूने दुसरं लग्न केलं म्हणून काय फरक पडतो’, असे म्हणत महाराष्ट्र करणी सेनेचे पदाधिकारी अजय सिंह सेंगर यांनी धनंजय मुंडे यांचे जोरदार समर्थन केले आहे.