Lockdown : मुंबई अन् पुण्यातील लॉकडाऊन 18 मे पर्यंत वाढवला जाण्याची शक्यता : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. येत्या 4 मे रोजी देशासह राज्यातील लॉकडाऊन कदाचित मागे घेतला जाऊ शकतो. परंतु पुणे आणि मुंबईतील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता या दोन्ही शहरात 18 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो, अशी शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्तवली आहे. त्यामुळे मुंबई आणि पुणेकरांना आणखी 15 दिवस घरातच बसावे लागण्याची शक्यता आहे.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही शक्यता वर्तवली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये या कारणामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. पण जर प्रादुर्भावच थांबत नसेल तर लॉकडाऊन वाढविण्याशिवाय काहीही पर्य़ाय नाही, असे टोपे यांनी सांगितले. झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाच्या केसेस झपाट्याने वाढत आहे, हीच सध्याची चिंतेची बाब आहे. सर्व कंटेन्मेंट झोनमध्ये आम्ही आणखी 15 दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

मागील 7 एप्रिलपासून कोंढवा आणि जुन्या पुण्यातील बाजारपेठा बंद आहेत. मागील महिन्याभरात मुंबई-पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले होते. याचाच अर्थ असा की पुणे आणि मुंबईतील सर्व हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन सुरु ठेवावे लागले. राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक कार्यक्रम, सोहळे-समारंभ 18 मे पर्यंत लॉकडाऊनचे निर्बंध कायम ठेवण्याची मागणी आम्ही सरकारकडे केली आहे. 3 मे नंतर या दोन्ही शहरातील हॉटस्पॉट परिसरात कमीत कमी 15 दिवस कोणत्याही बिगर महत्त्वाच्या सेवा सुरु करण्यास परवानगी देणार नसल्याचे टोपे यांनी सांगितले.