अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र ! मुंबईत काही ठिकाणी पावसाच्या सरी, राज्यात गारपिटीचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अरबी समुद्रात दक्षिण पूर्व भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याचा परिणाम संपूर्ण राज्यात ढगाळ हवामान दिसून येत आहे. मुंबई आज सकाळी काही भागात पावसाच्या हलक्या सरी आल्या. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधील अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यात सकाळपासूनच आकाशात ढगांनी गर्दी केली असून कधीही पावसाची हलकी सर येईल, असे वातावरण दिसून येत आहे.

गोव्यासह दक्षिण कोकणातील अनेक ठिकाणी मध्यरात्री हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. या ढगाळ हवामानामुळे तापमानात चांगलीच वाढ झाली असून थंडी कमी झाली आहे. नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव जिल्ह्यात आज व उद्या वादळी वार्‍यासह गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

धुळे व नाशिक जिल्ह्यात ११ व १२ डिसेंबर रोजी गारपिटीसह पावसाची शक्यता आहे. नंदूरबार जिल्ह्यात ११ डिसेंबर तर जळगाव जिल्ह्यात १२ डिसेंबर रोजी गारपिट होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकर्‍यांनी रानात असलेल्या पिकांची काळजी घ्यावी. उघड्यावर शेतमाल ठेवला असेल तर तो सुरक्षित ठिकाणी हलवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.