चक्रीय वात स्थितीचे झाले चक्रीवादळ अन् मुंबईत उडाला अफवांचा बाजार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

प्रादेशिक हवामान विभागाने गुजरात जवळ चक्रीय वात स्थिती निर्माण झाल्याचे म्हटले होते. हवामान विभागाकडून महानगरपालिकेला  आलेल्या ई-मेलनुसार महापालिकेने मंगळवारी दुपारी इशारा देणारे संदेश जारी केले. त्यात त्या चक्रीय वात चे चक्रीवादळ असे भाषांतर केल्याने एकच अफवांचा बाजार मुंबईत उडाला होता.

[amazon_link asins=’B01LY8U33X’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’68e94419-84cd-11e8-a4ab-59462a179bc0′]

प्रादेशिक हवामान विभागाकडून मुंबईत तीव्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. त्यात पालघर आणि ठाणे जिल्हांना  अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे मंगळवारी सकाळी पडणारा धो धो पाऊस पाहून मुंबईकरांमध्ये चिंता निर्माण झाली. त्यात महापालिकेकडून दुपारच्या सुमारास अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला. हवामान विभागाकडून आलेल्या ई-मेलनुसार हा इशारा महापालिकेने दिला होता आणि तेथेच घोळ झाला. इशारा देताना गुजरातजवळ चक्रीय वात स्थिती निर्माण झाल्याचे म्हटले होते, त्याला चक्रीवादळ असे संबोधले गेले.

यासंदर्भातील मेसेज सगळीकडे फॉरवर्ड व्हायला लागले आणि अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे आता किती पाणी साचणार याचा हिशेब लावणे सुरू झाले. या चर्चेसोबतच गुजरात येथील चक्रीय वात स्थितीला चक्रीवादळ असे संबोधले गेले. हे चक्रीवादळ वांद्रे-वरळी येथील समुद्रकिनाऱ्यावर  येऊन थडकणार आहे, असा संदेश फिरू लागला. त्यामुळेही भीतीचे वातावरण पसरले. यासंदर्भात महापालिकेकडून काही वेळाने मुंबईच्या जवळ असे कोणतेही चक्रीवादळ नाही हे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर हे अफवा पसरविणारे मेसेज शांत झाले आणि पावसानेही काही काळ उसंत घेतली होती.