लोकल सेवा सर्वांसाठी कधीपासून ?, CM ठाकरे यांनी दिले ‘हे’ संकेत

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन :  पाश्चिमात्य देशांत करोनाची दुसरी लाट आली आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक आहे. दुसऱ्या लाटेचा संभाव्य धोका आपल्याला टाळायचा आहे. ही बाब ध्यानात घेऊन भारतातही सर्वतोपरी सतर्कता बाळगण्यात येत आहे. या अनुषंगाने राज्यातील जनतेला महत्त्वाच्या सूचना करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray) यांनी मुंबई उपनगरीय लोकल पूर्ववत (Mumbai Suburban Local Services) करण्याबाबत सरकार पातळीवर कोणत्या हालचाली सुरू आहेत, याची माहिती आज दिली.

सर्व महिलांसाठी लोकलची दारे उघडण्यात आली आहेत. त्यासाठी वेळेचे बंधन घातले आहे. त्यानंतर पुढच्या टप्प्यात सर्वच प्रवाशांसाठी लोकलसेवा -(local-services-will-soon-be-open-to-all) सुरु केली जाणार आहे. त्याबाबत राज्य सरकारच्या वतीने एक सविस्तर प्रस्ताव रेल्वेला दिला आहे. ही सेवा कशी बहाल करायची, याबाबत कृती आराखडा तयार करण्याचे काम राज्य सरकार आणि रेल्वे यांच्या समन्वयातून सुरू आहे. रेल्वेने त्यादृष्टीने आधीच लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. सुमारे 85 टक्के लोकल सध्या धावत आहेत. या पार्श्वभूमीवर लोकल प्रत्यक्षात सर्वसामान्यांसाठी खुली कधी होणार, या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळालेले नसून यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज दिलासा देणारी माहिती दिली.

सर्व महिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिल्यानंतर आता सर्वांसाठी लोकल सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे. यात रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांचेही चांगले सहकार्य राज्य सरकारला मिळत आहे आणि याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी नमूद केले. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा संभाव्य धोका आपल्याला टाळायचा आहे.जशी खबरदारी आपण गेल्या सात महिन्यांपासून घेत आहोत तशीच खबरदारी पुढचे काही महिने आपल्याला घ्यायची आहे. आता बहुतेक सगळ्याच गोष्टी आपण सुरू केलेल्या आहेत. आपण प्रत्येक निर्णय अगदी काळजीपूर्वक घेत आहोत. तुमचे आरोग्य सरकारसाठी सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे मला कुणी वाईट म्हटले तरी मी घाईत कोणताही निर्णय घेणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.