पाण्यासाठी वणवण नाही होणार आता, ग्रामस्थांच्या सुचनेनुसार 250 बोअरवेलला मंजूरी

मुरबाड पोलीसनामा ऑनलाइन : कोरोना’च्या प्रादूर्भावामुळे ग्रामीण जनतेचे जीवन होरपळले असतानाच, ऐन उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईतून ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष गोटीराम पवार यांच्या प्रयत्नाने यंदा नवीनच सुरू केलेल्या योजनेनुसार २५० बोअरवेल खोदण्याच्या कामाला मंजूरी देण्यात आली आहे. या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड तालुक्याबरोबरच भिवंडी तालुक्यातील काही गावांना तीव्र पाणीटंचाई भासत आहे. नदीच्या पाण्याची पातळी घटण्याबरोबरच गावातील विहिरींनी तळ गाठल्यानंतर ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू होते. विशेषत: डोंगरमाथ्यावरील ग्रामस्थांचे हाल होतात. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी अर्थसंकल्पात सेसमधून १ कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यानुसार यंदाच्या उन्हाळ्यात टंचाईग्रस्त गावांमध्ये २५० बोअरवेल खोदण्याची योजना तयार केली होती.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दिपाली पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी नुकतीच अधिकारी व सदस्यांबरोबरच चर्चा केली. त्यानंतर जिल्हा परिषदेचे सदस्य व ग्रामस्थांच्या सुचनेनुसार विविध ठिकाणी २५० बोअरवेल खोदण्यास मंजुरी देण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील ठिकठिकाणी लवकरच बोअरवेल खोदाईचे काम सुरू करण्यात येणार आहे. ऐन उन्हाळ्यात बोअरवेल खोदल्यामुळे उन्हाळ्यापर्यंत टिकणाऱ्या पाण्याच्या स्त्रोतापर्यंत पोचता येईल. त्यामुळे या बोअरवेलला १२ महिने पाणी राहण्याची अपेक्षा आहे.

शहापूर व मुरबाड तालुक्यातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार संबंधित गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर बोअरवेल खोदल्या जाणार असल्यामुळे ग्रामस्थांचे हाल कमी होतील, अशी आशा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी व्यक्त केली.