‘तंबाखू’वरून दोन मित्रांत वाद, सपासप वार करून खून

सावंतवाडी : पोलीसनामा ऑनलाइन – तंबाखू मागण्यावरून झालेल्या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्रावर चाकूने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी दिलीप मोर्जे याला अटक केली असून त्याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्निल जोशी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

स्वप्निल जोशी आणि आरोपी दिलीप मोर्जे हे दोघे मित्र असून त्यांच्यामध्ये तंबाखू मागण्यावरून वाद झाले. हे वाद विकोपाला गेल्याने दिलीप याने स्वप्निलच्या छातीवर चाकूने सपासप वार केले. यामध्ये जास्त प्रमाणात रक्त स्त्राव झाल्याने स्वप्निल गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार बुधवारी (दि.6) रात्रीच्या सुमारास घडला असून या प्रकारामुळे आरोंदा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मयत स्वप्निल आणि आरोपी दिलीप हे दोघे एकाच वाड्यात राहत असून मोलमजुरी करत होते. बुधवारी रात्री वेळी तंबाखू मागण्यावरून वादावादीला सुरुवात झाली होती. त्यानंतर या दोघांमध्ये बाचाबाची झाली असे पोलिसांनी सांगितले. मोर्जे याने चाकूने सपासप वार करत स्वप्निलचा खून केला. पोलिसांनी घटनास्थळावरून चाकू जप्त केला आहे. अधिक तपास सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

Visit : Policenama.com