धक्कादायक ! पिंपरीत बेपत्ता तरूणाचा खून, मृतदेह जाळून राख टाकली नदीत

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भांडणाच्या रागातून तरुणाचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून राख नदीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरीमध्ये उघडकीस आला आहे. हा प्रकार तीन महिन्यांनी उघडकीस आला असून याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून केला आणि त्यानंतर त्याचा मृतदेह जाळून राख नदीत फेकली.

जसबीरसिंग उर्फ बिल्ली उर्फ विक्की गुलजारसिंग विरदी (वय – 19 रा. मिलिंदनगर, पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी निरज अशोक जांगयानी (वय 26 रा. मेन बाजार, पिंपरी), ललीत लालचंद ठाकूर (वय-21 रा. वैष्णोदेवी मंदिरामागे, पिंपरी), योगेश केशव पंजवाणी (वय-31, रा. संजय लायब्ररी लेन, गुरुद्वाराजवळ, पिंपरी), हरजोतसिंग रणजितसिंग लोहीट (वय -22 रा. वैष्णोदेवी मंदिराजवळ, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जसबिंदरसिंग आणि त्याचा भाऊ सनी विरदी यांनी आरोपी निरज जांगयानी याला मारहाण केली होती. ही घटना 7 मार्च 2020 रोजी घडली होती. याप्रकरणी जांगायानी याने त्याच रात्री अकराच्या सुमारास पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर निरज जांगयानी आणि इतर आरोपींनी पिंपरी येथील डेअरी फार्म रोड येथील एका गोठ्यात दारू पित बसले होते. आरोपी हरजोतसिंग लोहीट हा रात्री बाराच्या सुमारास जसबीरसिंग याला घेण्यासाठी पिंपरी येथील रिव्हर रोड येथे आला. जसबिरसिंग याला घेऊन रात्री साडेबाराच्या सुमारास आरोपी हरजोतसिंग गोठ्यात आला. याठिकाणी दारू पित असलेले आरोपी निरज जांगयानी व इतर आरोपी यांनी जसबीरसिंग याचा गळा दाबून आणि डोक्यात दगड मारून त्याचा खून केला. त्यानंतर गोठ्यातील चारा, कचपान, वाळलेली काटके तसेच शेण टाकून मृतदेह जाळून टाकला. त्यानंतर त्याची राख दापोडी पुलावरून नदीपात्रात टाकून पुरावा नष्ट केला.

दरम्यान, जसबीरसिंग विरदी हा 7 मार्च रोजी घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर तो पुन्हा घरी परतला नाही. त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार नातेवाईकांनी पोलिसांकडे केली होती. त्यानुसार पोलीस त्याचा शोध घेत होते. त्याचा खून झाल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता आरोपींनी त्याचा खून केल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.