ठाकरे सरकार आणणार मुस्लीम आरक्षण, ‘महाविकास’ सरकारमधील ‘या’ नेत्यानं सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात ठाकरे सरकार आल्यानंतर सरकारच्या अजेंड्यावर आता मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा आहे. यासंबंधित विधेयक लवकरच मांडण्यात येईल अशी माहिती मंत्री अस्लम शेख यांनी दिली. एकीकडे सीएएला विरोध होत असताना आता मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा राज्य सरकारकडून पुढे रेटण्यात येऊ शकतो.

आमदार आणि मंत्री अस्लम शेख म्हणाले की मुस्लीम आरक्षण हा महाविकासआघाडी सरकारच्या अजेंड्यावर आहे. हा मुद्दा आमच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग होता आणि आम्ही लवकरात लवकर यावर निर्णय घेऊ.

2014 साली राज्यात भाजप सेना युतीचे सरकार येण्यापूर्वी तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने राज्यात मराठा आरक्षण आणि मुस्लीम आरक्षण आणण्याचा ठराव समंत केला होता. परंतु सत्तापालट झाल्यानंतर फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला. त्यामुळे मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित राहिला. परंतु आता राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आल्यानंतर हा मुद्दा प्राधान्याने पुढे आल्याचे सांगण्यात येत आहे.

मंत्रिमंडळात बुधवारी मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचे समजते. याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इतर मंत्र्यांशी चर्चा केली. आता हा विषय प्राधान्याने पुढे रेटण्यात येणार असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात मराठा समाजाला 16 टक्के आणि मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव होता. शासकीय नोकरी, नोकरीतील बढती आणि शिक्षणसंधी यात हे आरक्षण देण्याचा विचार आहे.

भाजप सेना युती सरकारमध्ये मराठा आरक्षणाला गती मिळाली आणि हा कायदा संमत झाला होता. परंतु मुस्लीम आरक्षणाची मागणी बारगळली होती. हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेच्या काळात आता मुस्लीम आरक्षणाचा कायदा संमत होणार असे संकेत मिळत आहेत.