स्थायी समिती अध्यक्षपदासाठी माझेच नाव निश्चित होईल : शितल शिंदे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत जास्तीत जास्त नगरसेवकांना स्थायी समिती सदस्यपद मिळावे यासाठी कोअर कमिटी मध्ये ठरल्याप्रमाणे स्थायी समिती सदस्य पद एक वर्षासाठी देण्याचे ठरले. त्यामुळे मागील वर्षी मी व आताचे महापौर राहूल जाधव यांनी स्थायी समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. राहूल जाधव यांना महापौर पद देण्यात आले. यावर्षी मला स्थायी समिती अध्यक्षपद मिळावे म्हणून मला सर्व वरिष्ठ नेत्यांनी आणि कोअर कमिटीने ‘हिरवा कंदील’ दिला होता. परंतू शेवटच्या क्षणी काय झाले या बाबत माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. स्थायी समिती अध्यक्ष पदाची निवडणूक गुरुवारी (दि. 7 मार्च) आहे. तो पर्यंत माझेच नाव स्थायी समिती अध्यक्षपदासाठी वरिष्ठ नेते व कोअर कमिटी निश्चित करेल असा आशावाद भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक शितल शिंदे यांनी सोमवारी (दि. 4 मार्च) पिंपरीत पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला.

स्थायी समिती सदस्य पद फक्त एकच वर्षासाठी द्यायचे असे ठरले असतानाही मागील वर्षी स्थायी समितीत असणारे नगरसेवक विलास मडेगिरी यांचे नाव पुन्हा कसे काय आले? कदाचित कोअर कमिटी कडून हि चूक झाली असेल, हि चूक ते गुरुवार पर्यंत दुरुस्त करतील व माझेच नाव अध्यक्षपदासाठी घेतील असाही विश्वास शितल शिंदे यांनी व्यक्त केला. जर स्थायी समिती अध्यक्षपदासाठी नवीन सदस्याचे नाव घेतले असते तरी मी मान्य केले असते. परंतू मडेगिरी यांच्यासाठी ठरलेले धोरण का बदलण्यात आले? याबाबत मी वरिष्ठ नेत्यांकडे माझी कैफियत मांडली आहे. भाजपा हा पक्ष विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे माझ्यावरील अन्याय निश्चित होईल. असेही शितल शिंदे यांनी सांगितले.