अर्ध्या किंमतीत सोन्याचे अमिष दाखवून दीड लाख रूपये लूटले

हिंगोली : पोलीसनामा आॅनलाईन – आमच्याकडे खुप सोने असून अर्ध्या किंमतीत देतो असे सांगून एका सोनाराला दीड लाख रूपयाला लुटल्याचा प्रकार घडला आहे. दीड लाख रूपये घेऊन पोहचलेल्या सोनाराकडील पैसे हिसकावून हे भामटे पळून गेले. कारने पळुन जाणाऱ्या पुणे येथील या २ भामट्यांना आखाडाबाळापूर पोलिसांनी ताब्यात घेतले तर इतर २ जण पळून जाण्यात यशस्वी झाले.

हिंगोलीतील अक्षय चंद्रकांत राजूरकर व विकास सोळंके या दोघांना  काही भामट्यांनी सोन्याची नाणी अर्ध्या किमतीत देतो, असे म्हणून वारंगा फाटा येथे बोलावले होते, ठरल्यानुसार राजूरकर व सोळंके हे हिंगोली ते नांदेड महामार्गावरील वारंगा फाटा येथे पोहोचले. कारमधून आलेल्या तीन भामट्यांनी राजूरकर व सोळंके यांना बेदम मारहाण करून, त्यांच्याकडील दीड लाख रुपये हिसकावून घेऊन पळ काढला. सदरील घटनेची माहिती वारंगा फाटा चौकीच्या पोलिसांना कळताच, पोलिसांनी बोलडा मार्गे एक कार वेगाने जात असल्याची माहिती आखाडा बाळापूर येथील पोलिसांकडून मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर गेल्यानंतर ही कार दिसून आली. पोलिसांनी त्या कारचा पाठलाग करून ती कार अडवली. दरम्यान कारमधील गजानन दादाराव चव्हाण (रा. धानोरा, भुसे) ता. मानोरा जिल्हा वाशिम याला व अन्य एकास ताब्यात घेतले. तर इतर दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. त्या दोघांच्या शोधासाठी पथक रवाना केल्याचे पोलीस निरीक्षक केंद्रे यांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्यातील एकाच महिन्यातील ही दुसरी घटना असून काही दिवसांपूर्वी एक स्कार्पीओ अडवून ३ लाख लुटल्याची घटना घडली होती. आता या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

जाहिरात