कोपर्डी प्रकरणाची सुनावणी आता 25 फेब्रुवारीपासून नियमित होणार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – संपूर्ण देशात खळबळ माजविलेल्या कोपर्डी,जिल्हा अहमदनगर येथील बालिकेच्या बलात्कार-खून प्रकरणाची सुनावणी आता उच्च न्यायालयात 25 फेब्रुवारीपासून नियमित सुरू होणार.

दिनांक 27 जानेवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात *न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती तावडे* यांच्या खंडपीठासमोर झाली. यावेळी अहमदनगर जिल्हा न्यायालयाने सुनांवलेल्या फाशीच्या शिक्षेच्या निश्चितीकरणासाठी राज्य सरकारने दाखल केलेला अर्ज,तसेच आरोपी क्र 1,2 व 3 यांनी दाखल केलेली अपील व आरोपी क्र 1 व 3 यांच्या अपील दाखल करण्यास दाखल झालेला विलंब यावर खंडपीठाने सरकार पक्ष तसेच आरोपीचे वकील यांचे म्हणने ऐकून आरोपी क्र 1 व 3 यांचा अपील दाखल करण्यास दाखल करण्यास खालील विलंबमाफीचा अर्ज मंजूर केला.

त्याचप्रमाणे आरोपी क्र 1 याच्या वतीने कागदपत्र तपासणीसाठी मागणी करण्यात आली होती ती खंडपीठाने मान्य करून त्यासंबंधीचे निर्देश प्रशासनास दिले.

आरोपी क्र 1 च्या वतीने सदर प्रकरणाची सुनावणी मार्च महिन्यात ठेवण्याची विनंती केली होती त्यास राज्य सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील यादव-पाटील यांनी जोरदार आक्षेप घेऊन न्यायालयाच्या निदर्शनास आणले की,सदर प्रकरण हे 2016 मधील असून फाशीच्या शिक्षेचे असल्याने त्यावर लवकरात लवकर सुनावणी घेणे आवश्यक आहे.

यावर खंडपीठाने नापसंती दर्शवून सदर प्रकरणाची सुनावणी 25 फेब्रुवारीपासून नियमित घेण्यासंबंधी आदेश दिले,त्याचप्रमाणे कोणत्याही कारणासाठी सुनावणी पुढे तहकूब केली जाणार नसल्याचे आरोपीच्या वकिलांना सुनावले.

पुढील सुनावणीच्यावेळी तिनही आरोपीना कोर्टात उपस्थित ठेवण्यासंबंधी खंडपीठाने येरवडा तुरुंग प्रशासनास आदेश दिले आहेत.

या प्रकरणी दोषी आरोपींची फाशीची शिक्षा कायम होण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने जेष्ठ विधींज्ञ उमेशचंद्र यादव-पाटील यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा