नगर राष्ट्रवादीकडेच पवारांचा पुनरुच्चार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच राहणार असल्याचा पुनरुच्चार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दुपारी पुण्यातील पत्रकारपरिषदेत केला आहे. त्यामुळे विखे यांच्याकडे भाजपात प्रवेश करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही, असे बोलले जाऊ लागले आहे. दरम्यान त्यांनी काही निवडक कार्यकर्त्यांना मुंबईला बोलवून घेतले आहे.

लोकसभेच्या नगर मतदारसंघाचा वाद काही संपायला तयार नाही. डॉ. सुजय विखे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे वृत्त माध्यमातून येऊ लागल्यानंतर राष्ट्रवादी नगरची जागा काँग्रेससाठी सोडेल, अशी अपेक्षा होती. मात्र पवार यांनी ही अपेक्षा फोल ठरविली आहे. आज दुपारी पुण्यातील पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी नगरच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच हक्क असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगरची जागा लढविली जाईल, अशी परिस्थिती आहे. परिणामी विखे यांना भाजपात प्रवेश करण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नसल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जाऊ लागले आहे.

दरम्यान, डॉ. सुजय विखे यांनी निवडक समर्थकांना मुंबई बोलावून घेतले आहे. तेथे काही कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उद्या भाजपात प्रवेश केला जाऊ शकतो, असे बोलले जाऊ लागले आहेत. मात्र त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत विखे कुटुंबियानी अद्याप अधिकृतरीत्या काहीही जाहीर केलेले नाही.

पक्ष कार्यकर्त्यांचा विरोध

विख हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचे मानले जात असले, तरी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना कडाडून विरोध केला जात आहे. कार्यकर्त्यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्या प्रवेशाला जोरदार विरोध दर्शविला आहे. तसेच पालकमंत्री प्रा. राम शिंदे हे विखेंच्या प्रवेशास विरोध करीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नेमका काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.