नागपूरच्या महापौरांचा तुकाराम मुंढेंवर ‘निशाणा’ ! म्हणाले ….

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोनाबाधितांचा आकडा नागपुरात वाढत आहे. अशातच याला जबाबदार महापालिका प्रशासन असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी म्हंटले आहे. एकूणच अप्रत्यक्षपणे त्यांनी महापालिका आयुक्त मुंढे यांच्यावरच निशाणा साधला आहे.

याबाबत बोलताना महापैरांनी सांगितले की, नागपूरच्या आमदार निवास आणि इतर ठिकाणी कोरोना संशयितांना एकत्र क्वारंटाइन करून ठेवण्यात आलं आहे. यातील अनेकजण एकत्रितपणे वावरत आहेत. ज्यावेळी तपासणी अहवाल आला. त्यावेळी यातील काहींचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, तोपर्यंत त्यांच्यामुळे इतरांनीही लागण होते. त्यामुळं आधी तपासणी करून जे पॉझिटिव्ह येताहेत त्यांच्यावर उपचार आणि जे निगेटिव्ह येताहेत त्यांनाच क्वारंटाइन करून ठेवावे, असा सल्ला महापौरांनी दिला आहे.

कोरोनाबाधित ओळखण्यासाठी लाल आणि हिरवा टॅग
तसंच, ‘हे करताना ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणं आहेत. त्यांना लाल आणि ज्यांना नाही त्यांना हिरवा टॅग लावा. असं न केल्यास जर शहरात कोरोनाबाधितांचा आकडा आणखी वाढला तर याला सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार राहील, असं म्हणत महापौरांनी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचं नाव न घेता टीका केली.

देशातील ‘कोरोना’बाधितांची संख्या 18 हजार 601 वर
दरम्यान, कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या आता दररोज एक हजारांनी वाढू लागली असून मंगळवारी सकाळपर्यंत देशात कोरोना बाधितांची संख्या १८ हजार ६०१ पर्यंत पोहचली आहे. सोमवारी एका दिवसात देशात तब्बल १ हजार ३३६ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

दुसरीकडे कोरोना विषाणुची बाधा झालेल्यांच्या मृत्युची संख्याही वाढताना दिसत आहे. देशात आतापर्यंत ५९० जणांचा मृत्यु झाला आहे. गेल्या २४ तासात ४७ जणांचा मृत्यु झाला आहे.

असे असले तरी आता कोरोनाशी लढाई करुन त्याच्यावर मात करणार्‍यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी दिवसभरात ७०५ जण पूर्णपणे बरे झाले आहेत. आतापर्यंत ३ हजार २५२ कोरोना बाधित हे पूर्णपणे बरे होऊन आपापल्या घरी गेले आहेत.