अरूण गवळीला उच्च न्यायालयाचा ‘दणका’, दिला ‘हा’ आदेश

 नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – कुख्यात गुंड अरूण गवळीला नागपूर हायकोर्टाने दणका दिला असून पाच दिवसात नागपूर मध्यवर्ती कारागृहात शरण येण्याचा आदेश दिला आहे. गवळीने 24 तासांत मुंबई प्रशासनाकडे नागपूर प्रवास करण्याची परवानगी मागावी. ती परवानगी एका दिवसात मंजूर करावी आणि त्यानंतर तीन दिवसात अरुण गवळीने नागपूर गाठावे, असा आदेश हायकोर्टाने दिला आहे. यापुढे पॅरोलला मुदतवाढ देण्याबाबत कोणतीही याचिका स्विकारली जाणार नाही, असेही हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.

न्यायालयाने अरुण गवळीला नवी मुंबईमधील तळोजा कारागृहात जाऊन आत्मसमर्पण करण्याचा आदेश दिला होता. गवळीने पॅरोलसाठी अर्ज करताना कोणतेही गैरकृत्य आणि लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केले नसल्याचा युक्तिवाद केला होता. पण न्यायालयाने चांगली वर्तवणूक किंवा नियमांचं उल्लंघन न केल्याच्या धर्तीवर पॅरोल वाढवला जाऊ शकत नाही असे सांगत पॅरोल वाढवण्यासाठी कोणतीही कायदेशीर तरतूद नसल्याचे स्पष्ट केले. गवळी शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणी नागपूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.पत्नीच्या आजारपणाच्या कारणामुळे अरुण गवळी जवळपास 45 दिवसांसाठी पॅरोलवर नागपूर कारागृहातून बाहेर आला होता.

एप्रिल महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 27 एप्रिलला त्याने कारागृहात हजर होणे अपेक्षित होते. पण याचवेळी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला. त्यामुळे अरुण गवळीने अर्ज करत पॅरोल वाढवण्याची मागणी केली होती. यावेळी न्यायालयाने अर्ज स्विकारत 10 मे पर्यंत त्याच्या पॅरोलमध्ये वाढ केली होती. यानंतरही अरुण गवळीला वाढ देत 24 मे पर्यंत पॅरोल देण्यात आला होता. न्यायालयाने पॅरोलमध्ये अजून वाढ देण्यास नकार दिला आहे.