शिवसेनेला 55 अधिक जागा मिळणार नाहीत, भाजप स्वबळावर सत्तेत येईल

कणकवली : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला 50 ते 55 पेक्षा अधिक जागा मिळणार नाही. तसेच भाजप स्वबळावर पुन्हा सत्ता स्थापन करेल असे वक्तव्य भाजप नेते नारायण राणे यांनी केले आहे. विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नारायण राणे हे शिवसेनेवर आक्रमक होत निशाणा साधला आहे.

नारायण राणे यांनी आज (मंगळवार) प्रसारमाध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी एक्झिट पोलने जाहीर केलेल्या निष्कर्षाशी सहमत नसल्याचे सांगितले. भाजपला निवडणुकीत 164 पैकी 135 जागांवर विजय मिळेल. त्यामुळे भाजप सहजपणे स्वबळावर सत्ता स्थापन करेल. याउलट शिवसेनेची मजल 50 ते 55 च्या वर जाणार नाही असे राणे म्हणाले. यावेळी कणकवली लढतीवरून शिवसेनेला लक्ष केले. कणकवली विधानसभा मतदारसंघातून नितेश राणे हे 50 हजार मतांच्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त करत शिवसेनेच्या उमेदवाराला कोण ओळखतं का असा टोला लगावला.

शिवसेनेत कोणीही उठतो आणि तोंडाला येईल ते बोलत सुटतो. त्यामुळे त्याच्या प्रत्येक आरोपांना उत्तर द्यायला मी बांधील नसल्याचे राणे यांनी सांगितले. राणे यांनी केलेल्या टीकेला शिवसेना कशाप्रकारे उत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. एक्झिट पोलनुसार शिवसेनेला 55 जागा मिळतील असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेनेला 55 जागा मिळाल्यातर भाजपकडून लहान भाऊ म्हणून हिणवण्यात येणाऱ्या शिवसेनेवर नामुष्कीची वेळ येईल.

Visit : Policenama.com