भाजपला 2024 मध्ये महागात पडणार शिवसेनेसोबतचा पंगा ? जाणून घ्या सर्व्हे काय सांगतो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारने आणलेल्या कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. मागील दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांचे हे आंदोलन 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा मुख्य मुद्दा होण्याची शक्यता असून याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. त्यातच कृषी विधेयक लागू केल्यानंतर भाजपच्या जुन्या मित्र पक्षांनी भाजपची साथ सोडली. भाजपचा जुना मित्र असलेल्या शिरोमणी अकाली दलाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तर मागील वर्षी महाराष्ट्रात सर्वात जुना मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने भाजप सोबतचे आपलं संबंध तोडले. या सर्व गोष्टींचा विचार केला तर आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला याचा मोठा फटका बसू शकतो, असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

19 मित्र पक्षांनी एनडीएची साथ सोडली

भाजप सत्तेत आल्यानंतर 2014 पासून आतापर्यंत 19 पक्षांनी एनडीएची साथ सोडली आहे. कृषी विधेयकं संसदेत मांडली गेल्यावर भाजपाचा जुना मित्र पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तर राज्यस्थानमधील हनुमान बेनिवाल यांनी देखील याच कारणावरून भाजपमधून बाहेर पडत एनडीएला रामराम ठोकला. बेनिवाल हे राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे अध्यक्ष आहेत. यापुर्वी 2018 मध्ये चंद्राबाबू नायडूंच्या तेलुगू देशम पक्षाने (TDP) भाजपची सोडल्याने भाजपला दक्षिणेतील मोठा मित्र पक्ष गमवावा लागला.

महाराष्ट्रात शिवसेनेने साथ सोडली

2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना या दोघांनी एकत्र निवडणूक लढवली. मात्र, शिवसेनेने मुख्यमंत्री पदाच्या मुद्यावरून भाजपसोबत असलेली युती तोडली. शिवसेनेने विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन पक्षांशी हातमिळवणी करुन राज्यात महाविकास आघाडीची स्थापना केली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. राज्यात सर्वाधिक जागा जिंकून देखील भाजपला विरोधात बसावे लागले. लोकसभेच्या दृष्टीने महाराष्ट्र हे महत्त्वाचे राज्य मानले जाते. परंतु आता शिवसेनेने भाजपची साथ सोडल्याने याचा फटका येत्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला बसण्याची शक्यता आहे. अकाली दल आणि शिवसेना भाजपचे सर्वात जुने मित्र होते. या घडामोडीवर भाष्य करताना आता एनडीएमध्ये काय शिल्लक राहिलंय, असा सवाल शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला होता.

UPA, NDA बाहेरील पक्षांची महत्त्वाची भूमिका ठरणार

देशातील अनेक पक्ष काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी आणि भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग नाहीत. एका सर्वेक्षणानुसार, पुढील लोकसभा निवडणुकीत युपीए, एनडीए बाहेरच्या पक्षांना 30 टक्के मतांसह 129 जागा मिळू शकतात. ही आकडेवारी भाजपची मोठी डोकेदुखी वाढवणारी आहे.

इतर पक्षांना 201 जागा मिळण्याची शक्यता

2024 च्या निवडणुकीत इतर पक्षांना 44 टक्के मतांसह 201 जागा मिळण्याची शक्यता असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. या इतर पक्षांमध्ये समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, तृणमूल काँग्रेस पक्ष, पीडीपी, बीजेडी, एयूडीएफ, एमआयएम, आरएलडी, आजसू, एएमएमके, अकाली दल, टीआरएस, वायएसआर काँग्रेस, टीडीपीसह सर्व डाव्या पक्षांचा समावेश आहे.

2014 च्या निवडणुकीत शिवसेना, टीडीपीची महत्त्वाची भूमिका

2014 च्या निवडणुकीत देशात एनडीएचे सरकार आले. त्यावेळी एनडीएमधील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला 18 तर टीडीपीला 16 जागा मिळाल्या होत्या. एनडीएनं 38.4 टक्के मतांसह 336 जागांवर विजय मिळवला होता. यामध्ये शिवसेना 1.6 आणि टीडीपीनं 2.6 टक्के मतं मिळवली होती. अकली दलाने चार जिंकल्या होत्या. तर 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेनं 2.1 टक्के मतांसह 16 जागा जिंकल्या. 2019 च्या निवडणुकीत टीडीपी भाजपसोबत नव्हती. मात्र, टीडीपीची कमतरता नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयूनं भरून काढली. जेडीयूनं 16 जागा जिंकल्या. शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्यानंतर आता जेडीयू एनडीएमधील सर्वात मोठा घटक पक्ष आहे.