कोथिंबिरीने शेतकरी ‘मालामाल’, अवघ्या ३ एकरात १७ लाखाचे ‘उत्पन्न’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – दैनंदीन आहारात जेवणाची चव वाढवणारी कोथिंबीर एका शेतकऱ्यावर चांगलीच मेहरबान झाली आहे. एक रुपया ते जास्तीजास्त २० रुपयाला मिळणाऱ्या कोथिंबीरीमुळे शेतकऱ्याला सोन्याचा भाव मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यातील कोकणगावातील ( तालुका- निफाड) दोन शेतकऱ्यांना या कोथिंबीरीने भरघोस फायदा मिळवून दिला आहे. केवळ साडेतीन एकरात लावलेल्या या कोथिंबिरीला तब्बल १७ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. निफाड तालुक्यातील कोकणगावच्या रज्जाक सरदार सय्यद आणि सुरेश शंकर जाधव या शेतकऱ्यांनी हे कोथिंबीरीचे उत्पन्न घेतले आहे. कोथिंबिरीच्या या दमदार उत्पन्नाची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली असून, कोथिंबिरीच्या शेताचे फोटोही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.

व्यापाऱ्याकडून जागेवरच खरेदी
कोकणगाव येथील शेतकरी रज्जाक सय्यद आणि सुरेश जाधव यांनी साडेतीन एकरात एकत्रित कोथिंबीर लावली होती. सिन्नर तालुक्यातील मानोरी येथील व्यापारी सोमनाथ सांगळे यांनी या कोथिंबिरीच्या क्षेत्राची पाहणी करीत जागेवरच ती खरेदी करण्याचा निर्णय घेतला. कोथिंबिरीचा पहिला प्लॉट वीस दिवसांपूर्वी दहा लाखांत, तर याच कोथिंबिरीचा राहिलेला खोडवा सात लाख रुपये अशी एकूण सतरा लाख रुपयांना कोथिंबिरींची खरेदी करण्यात आली. या व्यवहाराचा चेक घेतानाचा फोटो आणि माहिती शुक्रवारी दिवसभर फेसबुक, व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याने हा चर्चेचा विषय झाला होता.

कष्टाचे चीज झाले – शेतकरी
शेतकरी फिरोज रज्जाक सय्यद म्हणाले की, नेहमीच कोथिंबीर करायची आणि भाव नसल्याने नांगरून टाकायची हे गेल्या काही वर्षांत आमच्या नशिबी होते. मात्र, यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आम्ही केलेल्या कष्टाचे चीज झाले आणि कोथिंबिरीला चांगला भाव मिळाला.

दरम्यान, जूनच्या आरंभी पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. मात्र, दीड महिना उलटला तरी तालुक्यात चांगला पाऊस होऊ शकला नाही. त्यामुळे आहे त्या पाण्याचा उपयोग करून सय्यद आणि जाधव यांनी कोथिंबिरीची काळजी घेतली आणि याच कोथिंबिरीने आता त्यांना भरघोस उत्पन्न मिळवून दिले. शिवाय कोथिंबीर खुडून मार्केटला घेऊन जाणे, भाव पुकारणे हा सायास व खर्चही वाचला आहे.

आरोग्यविषयक वृत्त