‘कोरोना’मुळे लाल किल्ल्यावर होणारा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम होणार ‘छोटेखानी’, कोणताही विद्यार्थी होणार नाही सहभागी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना विषाणू महामारीमुळे इतिहासात प्रथमच राष्ट्रीय राजधानीतील लाल किल्ल्यावर आयोजित स्वातंत्र्यदिन उत्सवाचा कालावधी मागील वर्षाच्या तुलनेत कमी करण्यात आला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी केवळ २० टक्के व्हीव्हीआयपी किंवा इतर सहभागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थेट भाषण पाहू शकतील.

तयारीचा घेतला आढावा

तयारीचा आढावा घेण्यासाठी संरक्षण सचिव अजय कुमार आणि एएसआयचे महासंचालक यांनी मागील आठवड्यात लाल किल्ल्याला भेट दिली. कुमार यांनी व्यवस्थांचा आढावा घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांना शारीरिक अंतर लक्षात घेऊन व्यवस्था करण्यास सांगितले.

कार्यक्रमात बदल

सूत्रांच्या माहितीनुसार, कार्यक्रमात यावेळी संपूर्ण बदल होणार आहे. त्यात कोणतीही मुले सामील होणार नाहीत. लाल किल्ल्यावरील समारंभात नॅशनल कॅडेट कोरचे कॅडेट सहभागी होतील. व्हीव्हीआयपी किल्ल्याच्या तटबंदीवर बसू शकणार नाहीत, जिथून पीएम स्वातंत्र्य दिनाला भाषण देतात. पूर्वी सुमारे ९०० व्हीव्हीआयपी दोन्ही बाजूच्या तटबंदीवर बसत असत, परंतु यावेळी या सर्वांना बसण्यासाठी नवीन व्यवस्था केली जाईल.

अंदाजे १०० लोकांना बसण्याची परवानगी

या वेळी केवळ १०० लोकांना बसण्याची परवानगी असेल. सर्वाधिक महत्वाचे म्हणजे कोरोनामधून बरे झालेले १,५०० विजेते या सोहळ्यात भाग घेतील. यामध्ये ५०० स्थानिक पोलिस असतील. याशिवाय देशातील विविध भागातील एक हजार लोक सहभागी होतील.

गेल्या वर्षी पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण पाहण्यासाठी किमान १०,००० लोक या सोहळ्याला उपस्थित होत असत. नुकत्याच झालेल्या एका बैठकीत संरक्षण मंत्रालयाने निर्णय घेतला की, जनतेऐवजी कोरोनाच्या विजेत्यांना स्वातंत्र्यदिन सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी सांगावे. नंतर ही नवीन योजना राबवण्यासाठी गृह मंत्रालयाला त्यानुसार काम करण्यास सांगितले.