चेन्नईत 740 टन अमोनियम नायट्रेट जप्त, लेबनानमध्ये घातक स्फोटाचं कारण हेच होतं केमिकल

चेन्नई : पोलीसनामा ऑनलाइन –  चेन्नईत अमोनियम नायट्रेटचे अनेक कंटेनर जप्त करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या कंटेनर्समध्ये एकुण 740 टन अमोनियम नायट्रेट बंद होते. हे तेच केमिकल आहे, ज्यामुळे मंगळवारी लेबनानची राजधानी बेरूतमध्ये भीषण स्फोट झाला.

या स्फोटात सुमारे 150 लोकांचा मृत्यू झाला आणि 5000 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. याशिवाय असंख्य लोक बेपत्ता आहेत, तर 2 लाख 50 हजार लोक बेघर झाले आहेत.

कस्टम अधिकार्‍यांनी सांगितले की, शहरापासून 20 किमी अंतरावर केमिकलचा मोठा साठा ठेवण्यात आला होता. मात्र, जेथे हा ठेवण्यात आला, ते रहिवाशी ठिकाण नाही. अमोनियम नायट्रेटचा वापर फर्टिलायजर व स्फोटकांच्या उत्पादनात केला जातो. 2015 मध्ये केमिकलचा हा साठा तमिळनाडु येथील कंपनी अम्मन केमिकल्समधून आणण्यात आला होता.

आयातीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने हा साठा जप्त करण्यात आला. कंपनीला कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे आणि प्रकरण सुद्धा दाखल आहे. या प्रकरणात अम्मन केमिकल्सचे एक पार्टनर पी कुमारेसन यांनी कमेंट देण्यास नकार दिला.