चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभुमीवर संरक्षण मंत्र्यांनी दिला तिन्ही सेनेला आदेश, ‘ड्रॅगन’ला उत्तर देण्यासाठी ‘रेडी’ राहा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वास्तविक नियंत्रण रेषेवरील चीनशी सुरू असलेल्या वादावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही सैन्याचे प्रमुख आणि सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासमवेत मोठी बैठक घेतली. या उच्चस्तरीय बैठकीत लडाखच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी संरक्षणमंत्र्यांनी चीनच्या कोणत्याही कारवाईला योग्य उत्तर देण्यासाठी सैन्यास पूर्णपणे तयार राहण्यास सांगितले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सैन्य दलांना एलएसीवर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीकडून करण्यात आलेल्या कोणत्याही प्रकारच्या आक्रमक वर्तनाला सामोरे जाण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले. याशिवाय सुरक्षा दलांना चीनच्या सर्व प्रकारच्या कारवायांवर बारीक नजर ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सोमवारी तीन दिवसांच्या रशिया दौर्‍यावर रवाना होतील. यावेळी, दुसऱ्या महायुद्धात जर्मनीवरील सोव्हिएत विजयाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त संरक्षण मंत्री मॉस्को येथे लष्करी परेडमध्ये उपस्थित राहतील. मूळत: परेड 9 मे रोजी होणार होती, परंतु कोरोना विषाणूच्या साथीमुळे त्यास पुढे ढकलण्यात आले होते. भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांचा रशियाचा दौरा निर्णायक असल्याचे समजते.

पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात चिनी सैन्यांबरोबर झालेल्या हिंसक चकमकीत भारतीय सैन्याच्या एका कर्नलसह 20 सैनिक शहीद झाले. त्याचबरोबर या चकमकीत चीनचेही मोठे नुकसान झाले आहे. चीनच्या सैन्य युनिटच्या कमांडिंग ऑफिसरसह 40 सैनिकांना भारतीय जवानांनी ठार केले. पाच दशकांहून अधिक काळातील दोन्ही देशांमधील हा सर्वात मोठा लष्करी संघर्ष आहे. यामुळे दोन्ही देशांमधील सीमेवर आधीच अस्तित्वात असलेला गतिरोध आणखी चिघळला आहे.