‘ही’ घोषणा देऊन सिद्धू फसला, शिख समाजाकडून निषेध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत असणारे माजी क्रिकेटर आणि पंजाब सरकारमधील काँग्रेसचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आला आहे. बिहारमधील कटिहार येथे मुसलमानांचे समर्थन प्राप्त करण्यासाठी सिद्धूने ‘अल्लाह हू अकबर’ ही घोषणा दिली. यानंतर छत्तीसगड शिख संघटनेचे प्रमुख अमरजीत सिंग यांनी सिद्धूने केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

अमरजीत सिंह छाबडा यांनी शिरोमणि गुरुद्वाराच्या समितीला एक पत्र पाठवून सिद्धूच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. सिद्धूने मुसलमानांचे समर्थन प्राप्त करण्यासाठी ‘अल्लाह हू अकबर’ ची घोषणा देऊन शिख परंपरा आणि नियमांचे उल्लंघन केले आहे, असे त्यांनी गुरुद्वाराला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. न्यायालयाने देशात धर्म, जातीच्या आधारावर मतं मागणे गुन्हा असेल असे सांगितले होते. सिद्धूने न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचेही अमजित सिंह यांनी म्हटले आहे.

याआधी सिद्धूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सर्व मुसलमानांनी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. भारतीय जनता पक्षाने याविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने सिद्धूला कारणे दाखवा नोटीस पाठवली आणि २४ तासांत उत्तर देण्याचे निर्देश दिले होते.