गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या युसूफ लकडावालाशी नवनीत राणांचे आर्थिक संबंध

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बांधाकाम व्यवसायिक युसुफ लकडावाला याला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अहमदाबाद विमानतळावर अटक केली. लकडावाला याच्या अटकेमुळे अमरावती लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार नवनीत राणा अडचणीत सापडल्या आहेत. नवनीत राणा यांनी युसुफ लकडावाला याला ८० लाख रुपये कर्ज दिल्याने गुन्हेगारी विश्वातील युसूफ लकडावालाशी असणारे संबंध नवनीत राणांनी स्पष्ट करावे, असे खासदार आनंदराव अडसूळ यांनी म्हटले आहे.

बनावट कागदपांच्या सहाय्याने खंडाळा येथील चार एकर जमीन बळकवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली बांधकाम व्यावसायिक युसुफ लकडावालाला (वय ७४) गुजरातमधून आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) अटक केली. लकडावाला विमानाद्वारे लंडनला जात असताना त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपींनी मावळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट कागदपत्र दाखल केले होते. याप्रकरणी दुय्यम निबंधक कार्यालयाकडूनच ईओडब्ल्यूकडे तक्रार करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी गुरुवारी (दि.११) `रेडकॉर्नर’ नोटीस बजावली होती.

हैदराबादमधील एका रॉयल फॅमिलीच्या नावे असणारी मावळ (पुणे) येथील ५० कोटी रुपये किंमतीची जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे हडपण्याचा प्रयत्न केल्याचा लकडावालावर आरोप आहे. लकडावाला आणि नायर यांनी २०१७ मध्ये बनावट कागदपत्रे सादर करून हैदराबादचे नवाब हुमायत नवाज जंगबहादूर यांची जमीन स्वतःच्या नावे हस्तांतरित करून घेतली होती.