भारतावर पुन्हा समुद्रमार्गे हल्ल्याची शक्यता : नौदल प्रमुख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एअर स्ट्राईक नंतरही भारताला दहशतवादी हल्ल्याचा धोका कायम आहे. दहशतवाद्यांना वेगवेगळ्या प्रकारे हल्ले करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. समुद्र मार्गानेही दहशतवादी हल्ला करू शकतात, असा इशारा नौदल प्रमुख ऍडमिरल सुनील लांबा यांनी दिला आहे. संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि राजनैतिक अधिकाऱ्यांच्या एका कार्यक्रमात नौदल प्रमुख लांबा यांनी ही माहिती दिली.
सुनील लांबा म्हणाले की , ‘तीन आठवड्यांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं भयावह रूप सगळ्यांनीच बघितलं आहे.  एका देशानं पुरस्कृत केलेल्या दहशतवादाचे परिणाम भारत भोगत आहे. भारताला अस्थिर करू पाहणाऱ्या देशाचा दहशतवाद्यांना पाठिंबा आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांना गेल्या काही वर्षांत दहशतवादाची मोठी झळ बसली आहे. जगातील काही देशच यातून वाचले आहेत. आता दहशतवाद वैश्विक पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळं धोका अधिकच वाढला आहे.’
२६/११ दहशतवादी हल्ला – यापूर्वी भारतावर समुद्रमार्गे अतिरेकी हल्ला झाला होता. पाकिस्तानच्या दहा अतिरेक्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी रात्री समुद्रमार्गे दक्षिण मुंबईत प्रवेश केला होता. त्यांनी ताज हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, नरिमन हाउस, हॉटेल ओबेरॉय, सीएसएमटी, कामा रुग्णालय या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला होता. २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या या हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह कमीतकमी १९७ जण ठार झाले, तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते.