गडचिरोलीत हत्या सत्र सुरुच ; नक्षलवाद्यांकडून ग्रामसभा अध्यक्षाची हत्या

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाईन – गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून आदिवासींचे हत्यासत्र सुरुच आहे. ताडगाव येथे पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून नक्षलवाद्यांनी ग्रामसभा अध्यक्षाची हत्या केली आहे. गेल्या १७ दिवसातील ही आठवी हत्या आहे.

छत्तीसगडमध्ये चकमकीत १० नक्षलींचा खात्मा करण्यात आला असतानाच दुसरीकडे गडचिरोलीत नक्षलींकडून हिंसाचार सुरूच आहे. बुधवारी रात्री नक्षलवाद्यांनी आणखी एकाची हत्या केल्याची घटना भामरागड तालुक्यातील विसामुंडी येथे घडली. आनंद मडावी असे हत्या मृताचे नाव असून पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून त्याची हत्या करण्यात आली.

यापूर्वी २२ जानेवारीला भामरागड तालुक्यातील कसनासूर येथील ३ नागरिकांची नक्षल्यांनी हत्या केली होती. त्यांचे मृतदेह भामरागड-आल्लापल्ली मार्गावर फेकून दिले होते. तर दुसऱ्याच दिवशी अनेक ठिकाणी नक्षली बॅनर आढळून आले.२५ ते ३१ जानेवारीपर्यंत नक्षल्यांकडून शहीद सप्ताह पाळण्यात आला होता. या सप्ताहादरम्यान नक्षल्यांनी अनेक ठिकाणी नक्षली बॅनर बांधून भीती निर्माण केली होती. काही ठिकाणी झाडे तोडून मार्गही रोखला होता.