माझी जात विचारू नका, मी छत्रपतींचा मावळा आहे : अमोल कोल्हे 

पुणे (जुन्नर) : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांचा हंगाम सुरु झाला आहे. अमोल कोल्हे हे जातीने माळी असल्यानेच त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे असे विधान शिरूर मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार आढळराव पाटील यांनी केले होते. त्यावर मी छत्रपतींचा मावळा असल्याचा टोला अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांनी लगावला आहे. जुन्नर येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.

खासदार आढळराव पाटलांच्या वक्तव्याचा समाचार घेताना अमोल कोल्हे म्हणाले की, ‘मी टप्या-टप्याने सगळं बोलेल. ये तो सिर्फ झाकी है. माझी जात कोणती आहे ते विचारू नका. माझी जात ‘छत्रपतींचा मावळा’ आहे.’ गेली १५ वर्ष शिवनेरीचा शिलेदार आहे असं म्हणणाऱ्यांना छत्रपतींचं स्मारक राष्ट्रीय स्मारक घोषित करता आले नाही. असा आरोपही त्यांनी आढळराव पाटलांवर केला.

संभाजी आणि शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील फोटो बॅनरवर न वापरण्याचे आवाहन
शिरुर मतदारसंघात जन्माला येणारा प्रत्येक जण मोठा भाग्यवान आहे. शिवाजी आणि संभाजी महाराज ही सर्वात मोठी प्रेरणा स्थाने या मतदारसंघात आहे. माझ्या संभाजी आणि शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील फोटो कोणत्याही बॅनरवर वापरू नका’ असे आवाहनही यावेळी अमोल कोल्हे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत कोल्हे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तेव्हापासून कोल्हे यांच्या शिरूरच्या उमेदवारीची चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे. शिरूर लोकसभा मतदार संघात माझ्याकडे तगडा उमेदवार असल्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितलं होतं. मात्र, आता तो तगडा उमेदवार हे अमोल कोल्हे असल्याचे स्पष्ट झालं आहे. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमच ते जुन्नरच्या दौऱ्यावर आहेत.

आढळराव पाटलांचा घणाघात ; कोल्हे माळी जातीचे असल्यामुळे त्यांना उमेदवारी