शरद पवार काँग्रेसचे नवे अध्यक्ष ; राहुल गांधी विरोधी पक्षनेते ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार असल्याचे जवळपास नक्की झाले आहे. मात्र त्याला किती कालावधी लागेल हे सांगता येत नाही. मात्र, विलीनीकरणानंतर राज्य नेतृत्वाबाबत काय करायचे, हे स्पष्ट झालेले नाही. उच्चपदस्थ नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही बातमी खरी असल्याचे समोर येत आहे.

याबाबत काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले कि, याबाबत राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याने याविषयीचा निर्णय जवळपास नक्की असल्याचे त्यांनी सांगितले. या दोघा नेत्यांच्या विचारांत कमालीचे साधर्म्य असून, लोकसभा निवडणुकांचे निकाल पाहता, दोन्ही पक्षांना विलिनीकरणाबाबत निर्णय घेण्याची वेळ आली आहे. विलीनीकरण नक्की असून याला किती दिवस लागतील हे मात्र त्यांनी सांगितले नाही.

राहुल गांधी हे पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यावर ठाम असल्याने त्यांच्या जागी शरद पवार पक्षाध्यक्ष होतील आणि राहुल गांधी विरोधी पक्षनेतेपदी बसतील अशी चर्चा आहे, मात्र याविषयी आताच बोलणे चुकीचे ठरेल, असेदेखील या पदाधिकाऱ्याने सांगितले. अध्यक्षपद आणि या सगळ्या बाबतीत निर्णय हे राहुल गांधीच घेणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, लोकसभेत विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी ५५ जागांची गरज असते. मात्र काँग्रेसकडे ५२ खासदार आहेत. त्यामुळे ५ खासदार असलेल्या राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण झाले तर हे पद मिळवणे त्यांच्यासाठी सोपे जाईल. त्यामुळे राहुल गांधी संसदेत आणि शरद पवार बाहेर हे समीकरण फारच उत्तम होईल, असेदेखील या नेत्याने म्हटले.