पक्षांतर केल्यानं ‘मंत्रिपद’ गमावलं, शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीच बरी, ‘या’ दिग्गज नेत्याची ‘भावना’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाविकास आघाडीने मंत्रिमंडळाचा विस्तार केला असून त्यात अनेक दिग्ग्ज नेत्यांना डावलण्यात आलेले आहे. त्यामुळे अनेक नेत्यांकडून नाराजीचे सूर ऐकायला मिळाले. त्यात आता अजून एक नावाची भर पडली ते म्हणजे माजी मंत्री भास्कर जाधव होय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोंडी होत असल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला व शिवसेनेही त्यांना मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते, पण मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना मंत्रिपदापासून दूरच राहावे लागले म्हणून शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीच बरा होता, अशी भावना सद्यस्थितीला त्यांची झालेली आहे.

विशेष म्हणजे कोकणातील अनेक आक्रमक नेत्यांमध्ये भास्कर जाधव यांची गणना केली जाते. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याशी देखील दोन हात करण्याचे धाडस त्यांनी केले होते. भास्कर जाधव १९९९ मध्ये शिवसेनेच्या वतीने निवडून आले होते. परंतु २००४ च्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. म्हणून त्यांनी शिवसेनेला राजीनामा देत राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी आपल्या कारकिर्दीत मंत्री, प्रदेशाध्यक्षपद अशी महत्त्वाच्या पदांचा कार्यभार देखील सांभाळला. दरम्यान कोकणातील राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्याशी त्यांचे बिनसले. आणि त्यांच्यातील वाद हा वाढत गेला. राष्ट्रवादी पक्षाच्या नेतृत्वाने त्यांच्या या वादाकडे दुर्लक्ष केले होते.

राज्यात विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देत पुन्हा शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. कारण त्यांच्यात आणि तटकरे यांच्यात वाद झाल्याप्रकरणी तटकरे यांच्याकडून दगाफटका होण्याची भीती जाधवांना होती. तब्बल १५ वर्षांनी त्यांनी शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला तेव्हा त्यांना सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र मंत्रिमंडळ विस्तारात कोकणातील उदय सामंत यांना मंत्रिपद देण्यात आले असून भास्कर जाधव यांना मंत्रिपदापासून वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे राष्ट्रवादी सोडली नसती तर मंत्रिपद तरी मिळाले असते. अशी भावना त्यांची झाली आहे. त्यांनी सांगितले की, कोणाला मंत्री करायचे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. परंतु राजकारणातील ज्येष्ठतेच्या मुद्दय़ावर आपला विचार व्हायला पाहिजे होता अशी आपली ठाम भावना आहे. अर्थात पक्षाचा निर्णय मला मान्य आहे असे माजी मंत्री भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/