‘… म्हणून फडणवीस दर 3 महिन्यांनी तसे बोलतात’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकासआघाडीचं सरकार पडणार हे आम्ही शपथ घेतल्यापासून ऐकत आलो आहे. याचा अर्थ सरकारच्या अस्थिरतेची कल्पना विरोधकांनाही आहे. पण स्वत:चे सैन्य (पक्षातील आमदार) टिकवण्यासाठी दर तीन महिन्यांनी देवेंद्र फडवणीस व इतर नेत्यांना तसं बोलावं लागतं. असं म्हणत महाविकासआघाडी सरकारच्या भवितव्याबद्दल भाष्य करणारे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्यावर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी जोरदार निशाणा साधला.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटनप्रसंगी पाटील बोलत होते. महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना राज्यातील भाजप नेत्यांकडून सरकारबद्दल नेहमी वक्तव्य केली जातात. हे सरकार फार काळ टिकणार नाही.पक्षातील अंतर्गत विरोध यामुळे सरकार पडेल असं बोललं जातं. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अशा वक्तव्यांना पुन्हा एकदा जोर चढला आहे.

पुणे पदवीधर निवडणूक भाजप – राष्ट्रवादी प्रतिष्ठेची लढाई
विरोधकांच्या या भाकितांचा जयंत पाटील यांनी आज जोरदार समाचार घेतला. यामुळेच नाथाभाऊंना पक्ष सोडावा लागला. असं पाटील म्हणाले. आमचं सरकार बळकट आहे, विरोधी पक्षातील उमेदवारांमध्ये भांडणे सुरु आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला.

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकासआघाडीचे उमेदवार अरुण लांडे यांनी अर्ज भरला आहे. यावेळी या दोन्ही नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर जी टीका केली त्याला उत्तर दिले. सरकार स्थापन झाल्यापासून चंद्रकांत पाटील हे सरकार पडेल असं बोलत आहे. अवघ्या दोन महिन्यात पडेल असेही ते म्हणाले होते. मात्र एक वर्ष पूर्ण झालं. हे सरकार आता चार वर्षे पूर्ण करेल. चंद्रकांत पाटील यांनी आता स्वप्नच पहावं असा टोला थोरात यांनी लगावला.