रोहित पवारांची भाजपचे आमदार राम कदमांवर ‘त्या’ विधानावरून टीका, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई पोलिसांना (Mumbai Police) माफिया म्हणणाऱ्यांच्या बाजूने भाजपाच्या (BJP) नेत्यांनी यापूर्वी आंदोलन केले. आता मुंबई पोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर कारवाई करू नका, म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. यावरुनच यांची विचारसरणी कशी आहे, हे लोकांना समजत आहे. यापलीकडं आपण काय बोलणार ? असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी भाजप आमदार राम कदम यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्वीट करत आ. कदमावर टीका केली.

पवई पोलिसांच्या एका कॉन्टेबलला भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली होती. आरोपी हे आमदार राम कदम यांचे कार्यकर्ते असून त्यांना वाचविण्यासाठी राम कदम यांनी मारहाण झालेल्या पोलिसाला फोन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी राम कदम यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

काय आहे प्रकरण ?
नितीन खैरमोडे असे मारहाण झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. पवईच्या हिरानंदानी येथे गॅलरिया मॉलजवळ एका ज्येष्ठ महिला डॉक्टरच्या गाडीला भाजपच्या कार्यकर्ते सचिन तिवारी, दिपू तिवारी आणि आयुष राजभर दुचाकीवरुन येत धडक दिली होती. नियमांचं उल्लंघन करत हे भाजपचे कार्यकर्ते ट्रिपल सीट प्रवास करत होते. यावेळी घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे दाखल झाले. त्यांनी आरोपींना ताब्यात घेऊन रिक्षाने नेत असताना कार्यकर्त्यांनी रिक्षातच खैरमोडे यांना जबर मारहाण केली. या तिघांना वाचविण्यासाठी आ. कदम यांनी खैरमोडे यांना फोन केला. राम कदम आणि खैरमोडे यांच्यात झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिप समोर आली आहे.

“तुम्हाला झालेल्या मारहाणीचं मी समर्थन करत नाही. पण मानवतेच्या दृष्टीकोनातून आणि त्या तिघांच्या भविष्याचा विचार करा. त्या तिघांच्या करिअरचा प्रश्न आहे. त्यांचं लग्नही झालेलं नाही, असे सांगत आय कदम यांनी खैरमोडे यांच्याकडे तक्रार मागे घेण्याची मागणी केली. दरम्यान, कॉन्स्टेबल खैरमोडे यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या प्रतीमेचा प्रश्न असून असं करणं योग्य ठरणार नाही, असं ठामपणे सांगून राम कदम यांच्या मागणीला स्पष्ट नकार दिला.