…म्हणूनच धनंजय मुंडे प्रकरणात खोलात जाण्याची गरज असल्याचा निष्कर्ष काढला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांआधी सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्माने धनंजय मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. त्यामुळे धनंयज मुंडे यांना मोठा दिलासा मिळाल्याचे बोलल जात आहे. दरम्यान, मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार माध्यमांशी बोलताना या मुद्द्यावर म्हणाले की, रेणू शर्माने धनंजय मुंडें विरोधातील तक्रार मागे घेतली, त्याविषयी फारशी माहिती नाही. मात्र या संबंधात कागदपत्रं जेव्हा आमच्या हातात आली, तेव्हा खोलात जाण्याची गरज आहे, असा आम्ही निष्कर्ष काढला.त्यामुळे तो बरोबर होता असं म्हणायला लागेल, असं शरद पवारांनी सांगितलं.

काही दिवसापूर्वी  धनंजय मुंडे यांच्या विरोधातील तक्रारीचे स्वरूप गंभीर आहे. त्यांची पक्षाने नोंद घेतली आहे. मी स्वत: त्यांच्याशी बोललो होतो. मात्र, या प्रकरणाच्या खोलात जाऊन चौकशी व्हायला हवी. त्यानंतरच पक्ष पुढील निर्णय घेईल,’ अशी भूमिका घेत शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची शक्यता तूर्त फेटाळून लावली होती. रेणू शर्माने तक्रार मागे घेताना कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं सांगत पोलिसांना तिने लेखी लिहून दिलं आहे. गेल्या काही वेळापासून तिची बहिण (करुणा शर्मा) आणि धनंजय मुंडे यांच्यात सलोख्याचे संबंध नव्हते. त्यामुळे ती मानसिक दबावाखाली होती, असं रेणू शर्माने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे. याबरोबरच रेणू शर्मांच्या वकिलांनी देखील केस सोडल्याची माहिती समोर येत आहे.

काय केले होते रेणू शर्माने आरोप
बॉलिवूडमध्ये काम देतो असे सांगत धनंजय मुंडेंनी २०१३ पासून त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली. मला सांत्वन दाखवून, विश्वास देऊन केवळ माझा वापर करून घेतला. मला उद्ध्वस्त केलं. लग्नाचं वचन देऊन माझा वापर करून घेतला, असे खळबळजनक आरोप तक्रारदार महिलेनं केले, गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्यावर अन्याय होत असताना गप्प का राहिलात, असा प्रश्न महिलेला विचारण्यात येत होता. त्यावर धनंजय मुंडेंकडे माझे आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओ होते. ते व्हिडीओ कॉलवरही शरीर संबंधांची मागणी करायचे आणि त्यानंतर शरीरसंबंध ठेवायचे. त्यामुळे मी गप्प होते. आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची माझी इच्छा होती. मी अतिशय महत्त्वाकांक्षी होते. त्याचाच मुंडेंनी गैरवापर केला. मी तुझ्या मागे खंबीरपणे उभा राहीन, असं आश्वासन देऊन त्यांनी माझा फक्त वापर केला, असा गंभीर रेणू शर्माने केला होता.

माझ्यावरचे आरोप खोटे, मला ब्लॅकमेल करणारे- धनंजय मुंडे
रेणू शर्माने धनंजय मुडेंवर बलात्काराची तक्रार केल्यानंतर धनंजय मुडेंनी फेसबुकद्वारे एक पोस्ट करत या आरोपांचे खंडन केले. माझ्याविरुद्ध होणारे आरोप पूर्णपणे खोटे आणि बदनामी, ब्लॅकमेल करणारे आहेत. धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं. समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया व सोशल मीडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. या प्रकरणी रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने (या रेणु शर्मा या करुणा शर्मा यांच्या सख्या लहान बहीण आहेत) स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो. हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे असून या प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती खालील प्रमाणे आहे असे नमूद केलं होतं.