विधानसभा 2019 : काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये ‘त्या’ 68 जागांवरून आडलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेसमध्ये 288 पैकी 220 जगांवर एकमत झाले आहे. तर काही जागांची अदलाबदल करण्याचा राष्ट्रवादी आग्रही असून त्यातील काही जागांबाबत चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादीने राज्यातील सर्वच जागांचा आढावा घेतला असून 220 जागांवर एकमत झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आज पुण्यामध्ये पार पडली. या बैठकीला पक्षाध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, शशिकांत शिंदे, सुप्रिया सुळे आदी उपस्थित होते. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पक्षांतराचे परिणाम, विरोधकांची ताकद, आघाडीतील जागा वाटपाचे जुने सुत्र या मुद्यांवर चर्चा झाली.

विधानसभेच्या बहुतांश जागांचा निर्णय झाल्याने ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आघाडीचे चित्र स्पष्ट होईल, असे जयंत पाटील यांनी जाहीर केले होते. मात्र, सप्टेंबर महिना उजाडला तरी जागांचा प्रश्न सुटला नाही. यावर आजच्या बैठकीत सर्वच जागांवरील स्थिती जाणून घेण्यात आली.