राष्ट्रवादीने लोकसभेसाठी शोधला दुसर्‍या पक्षातील उमेदवार !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – माजी आमदार नरेंद्र घुले यांनी उमेदवारी करण्यास नकार दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेसाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांचे नाव चर्चेत आले आहे. नागवडे या काँग्रेसच्या निष्ठावंत असून, त्यांना उमेदवारी देण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार हे आग्रही असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
अनुराधा नागवडे यांना माहेर व सासर या दोन्ही ठिकाणावरून मोठी राजकीय परंपरा आहे. सासरे सहकारमहर्षी दिवंगत शिवाजीराव नागवडे हे राज्य साखर संघाचे अध्यक्ष होते. तसेच श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून दोनदा आमदार झालेले होते. त्यांचा राज्याच्या राजकारणात विशेष प्रभाव होता. अनुराधा नागवडे याही अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय झालेल्या असून सध्या अहमदनगर जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आहेत. त्यांची राजकीय जाण चांगली आहे, असे बोलले जाते. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभा उमेदवारीसाठी त्यांचे नाव पुढे केले जाऊ लागले आहे.

शिवसेनेने भाजपशी युती केल्याने ‘यांचा’ शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ 

नगरच्या जागेसाठी काँग्रेस पक्ष आग्रही आहे. डॉ. सुजय विखे यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षाकडून आघाडीच्या जागावाटपात नगरच्या जागेबाबत जोरदार आग्रह धरला जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी जागा सोडायला तयार नाही. विखे यांच्यावर कुरघोडी करण्यासाठी भावकीतील वादाचा फायदा घेऊन शरद पवार यांनी डॉ  अशोक विखे पाटील यांनाही उमेदवारीची ऑफर दिली होती. मात्र त्यांनी नकार दिल्यानंतर माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली. त्यांच्याशी बोलणी केली. मात्र घुले यांनी नकार दिला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दुसऱ्या पक्षातून उमेदवाराचा शोध सुरू केला.
विखे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील असून ते नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत इच्छुक असल्याने काँग्रेस पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. याचाच फायदा घेऊन काँग्रेसचे निष्ठावंत मानले जाणाऱ्या नागवडे घराण्यातील अनुराधा नागवडे यांच्या उमेदवारीसाठी पवार यांनी गळ घातली आहे. अनुराधा नागवडे यांचे पती राजेंद्र नागवडे यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्राथमिक बोलणी झालेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनुराधा नागवडे यांचे नाव चर्चेत आले आहे. काँग्रेस पक्षाला जागा सोडायची नाही, यासाठी राष्ट्रवादी आग्रही असून त्यासाठीच त्यांनी दुसर्‍या पक्षातील उमेदवाराला आयात करण्याचा निर्णय घेतला आहे, असे समजते.