‘पडणारं प्रत्येक झाड त्यांचा एक-एक आमदार पाडणार’ ! (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुंबईतील मेट्रोसाठी प्रस्तावित असलेल्या कारशेडसाठी करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहेत. काल रात्री आरेच्या जंगलात करण्यात आलेल्या वृक्षतोडीमुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले असून प्रत्येक झाडाप्रमाणे आपला एक आमदार पडणार असल्याची सरकारला जाणीव व्हावी, अशा कडक शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली आहे.

याविषयी अधिक बोलताना आव्हाड म्हणाले कि, या झाडांप्रमाणे आपले देखील आमदार पडणार असल्याची सरकारला जाणीव झाल्यानंतर हे सरकार झाडं पाडण्याची हिम्मत करणार नाही. त्याचबरोबर शिवसेना आणि भाजपवर देखील त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले कि, एकाने आम्ही आरे पाडणार असे म्हटले होते तर एकाने आम्ही आरे पडू देणार नाही, असे म्हटले होते, त्यामुळे दोघांनीही मुंबईकरांना फसवल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता दोघेही एकत्र येऊन झाडे पाडत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर कालपर्यंत झाडांना मिठ्या मारणारे आता कुठे गेले? एकही झाड पडू न देणारे म्हणणारे कुठे गेले ? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, अनेक दिवसांपासून या कारशेड संदर्भात गोंधळ सुरु असून अनेक याचिका देखील मुंबई हायकोर्टाने फेटाळल्याने अखेर काल जंगलातील झाडे तोडण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी करत याचा विरोध केला. त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी गर्दीला पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्याचा देखील आरोप स्थानिकांनी केला.

visit : Policenama.com