पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले – ‘युतीत असताना स्व. बाळासाहेब तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता ते फक्त उध्दवजींचे वडील?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे देशाची अवस्था बिकट झाली असताना दिल्लीत नव्या संसद भवनाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनीही नवे संसद भवन महत्त्वाचे आहे की, देशातील नागरिकांचे लसीकरण, असा थेट सवाल उपस्थित केला होता. त्यावरून भाजप नेते अतुल भातखळकर ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री ४०० कोटी रुपये खर्चून वडिलांचे स्मारक उभरताय, त्यांना हा प्रश्न विचारा रोहित पवारजी. आपल्या गृहमंत्र्याने फक्त मुंबईतून केलेली वसूली दीड हजार कोटी आहे म्हणतात, ती रक्कम लसीकरणासाठी वळवा म्हणतो मी अशा शब्दात टीका केली होती. यावरून आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून अतुल भातखळकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

रोहित पवार म्हणाले, युतीत असताना स्व. बाळासाहेब ठाकरे हे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता ते फक्त उद्धवजींचे वडील? भावना आणि भूमिका सत्तेच्या पलीकडील असतात, असे ऐकले होते. परंतु आपल्या भावना सत्ता जाताच बदलल्या. अशी सोयीस्कर भूमिका बदलावी तर तुम्हीच असा टोला भातखळकर यांना लगावला आहे.

नव्या संसद भवनाच्या कामावरून यांनी केंद्र सरकारवर टीका करताना म्हणाले होते की, गांभीर्य पाहून प्रत्येक गोष्टीचा प्राधान्यक्रम ठरवावा लागतो. त्यानुसार सध्या देशाची काय प्राथमिकता आहे याचा पुनर्विचार होणे गरजेचे आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे लसीकरणाला प्राधान्यक्रम देणे आवश्यक आहे. लसीकरणाचा हजारो कोटींचा भर राज्य सरकारे उचलत असताना केंद्र सरकार लसीकरणाचा भार राज्यांवर लोटून ‘सेंट्रल विस्टा’ प्रकल्पाचा भार उचलत आहे. मात्र आज हे अपेक्षित नाही असे ट्वीटमध्ये त्यांनी म्हंटले होते.