एकनाथ खडसेंचा संभाव्य राष्ट्रवादी प्रवेश, खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या – ‘प्रदेशाध्यक्षांना विचारा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या संभाव्य राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल दोन्ही पक्षातील नेत्यांची अळीमिळी गुपचिळी सुरूच आहे. आधी भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी खडसेंच्या पक्षांतराचा चेंडू त्यांच्या सूनबाई खासदार रक्षा खडसे यांच्याकडे टोलवला होता. आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे बोट दाखवलं आहे.

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाद्दल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारा असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी बोलणं टाळलं. नवरात्रीच्या पहिल्या माळेला खडसे राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधण्याची चर्चा आहे. मात्र अवघ्या काही तासांवर घटस्थापना आली असतानाही त्याबद्दल स्पष्टता नाही.

‘पवार कुटुंबियांवर टीकेशिवाय हेडपलाईन्स होत नाहीत’
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ज्या भागात कृषी विधेयकासाठी रॅली काढली त्याच भागात साखर कारखान बंद आहे. पवार कुटुंबियांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन्स होत नाहीत. कोणीही यावं आणि मनमोकळं करावं. आम्ही दिलदार आहोत” असा टोलाही सुळेंनी लगावला आहे.

पुण्यात गेल्या 2 वर्षात पूरस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळं त्याला आम्ही जबाबदार असल्याच्या आरोपात तथ्य नाही. पुण्यातील पुरास कारणीभूत ठरलेल्या अंबिल ओढ्याची वर्क ऑर्डर 2 दिवसात काढणार हा विषय मार्गी लावणार असं आश्वासनही सुप्रिया सुळेंनी दिलं आहे.