पाकिस्तानी साखरेच्या गोदामावर राष्ट्रवादीचा छापा

मुंबई : वृत्तसंस्था
देशात साखरेचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. तरी देखील पाकिस्तानातून साखर आयात केली जाते आणि आता त्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पाकिस्तानमधून आयात होणाऱ्या साखरेवरुन मनसेने इशारा दिला असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने कल्याण तालुक्यातील एका गोदामावर सोमवारी सकाळी धडक दिली. या गोदामात पाकिस्तानमधून आयात केलेली साखर लपवून ठेवण्यात आली होती. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानी साखरेच्या गोण्या फाडून विरोध दर्शवला. या गोदामात दोन हजार मेट्रीक टन साखर लपवून ठेवण्यात आली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड ,राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानातून आयात केलेल्या साखसरेविरुद्ध आंदोलन करण्यात आले होते. या बाबत माहिती देताना आव्हाड म्हणाले की,”पाकिस्तानातून गेले काही दिवस आयात केलेली साखर कोणत्या गोदामात आहे याचा आम्ही शोध घेत होतो.ही साखर अखेर कोणत्या गोदामात आहे याचा सुगावा लागला आणि आम्ही तिथे पोहचलो. सौरभ मल्होत्रा नामक व्यावसायिकाने ही साखर मागवली असून सुकमा एक्स्पोर्ट्स मार्फत ही साखर राज्यात पोहोचली. या कंपनीने ४२०० मेट्रिक टन साखर मागवली असून त्यातील दोन हजार मेट्रिक टन साखर या गोदामात लपवून ठेवण्यात आली होती,” असे आव्हाड यांनी सांगितले.

राज्यात पाकिस्तानी साखर नको, असे सांगत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी साखरेने भरलेल्या गोण्या फाडून विरोध दर्शवला. ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.