नाशिक डिस्ट्रिक्ट सेकेंडरी टिचर्स अ‍ॅन्ड नॉन टिचिंग एम्पॉई को-ऑप सोसा.चे चेअरमन बनकर अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या महिन्यात नाशिक जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांची अर्थवाहिनी असलेल्या डिस्ट्रिक्ट टीचर्स ऍण्ड नॉन टिचिंग एम्पॉई को-ऑप. सोसायटीचे शाखा व्यवस्थापक व व्यवस्थापकाला कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतनाच्या रकमेपोटी लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती. त्यानंतर याप्रकरणी काही महत्वाचे पुरावे ‘लाचलुचपत’च्या हाती लागल्याने आता सोसायटीचे चेअरमन रामराव बनकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) अटक केली आहे.

नाशिक डिस्ट्रिक्‍ट सेंकेंडरी टिचर्स ऍण्ड नॉन टिचिंग एम्पॉई को-ऑप. सोसायटीचे शाखा व्यवस्थापक शरद जाधव, व्यवस्थापक जयप्रकाश कुवर यांनी सोसायटीच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार फरकाची रक्कम व वेतन देण्यासाठी संचालक मंडळाच्या सांगण्यानुसार ५० टक्के रकमेची मागणी केली होती. त्यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली असता, गेल्या १० जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभगाच्या पथकाने दोघांना सोसायटीमध्येच अटक केली होती.

अनेक गैरव्यवहार उघड होण्याची शक्यता

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तपास सुरु असताना, सोसायटीचे चेअरमन रामराव बनकर यांचे फोनवरील संभाषण तपास पथकाच्या हाती लागले आहे. त्यामुळे चेअरमन सुद्धा या लाचप्रकरणात सहभागी असल्याचं निष्पन्न झाले. त्यानुसार लाचलुचपतचे पोलीस निरीक्षक हेमंत भामरे यांच्या पथकाने चेअरमन बनकर यांना अटक केली आहे. त्यामुळे या लाचलुचपत प्रकरणाचे धागेदोरे आता सोसायटीच्या संचालकांपर्यंत पोहचण्याची, तसेच चेअरमनच्या अटकेमुळे अनेक गैरव्यवहार उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सोसायटीच्या सभासदांमध्ये आनंदाचे उधाण

काही सभासदांनी सोसायटीतील लाचप्रकरण उघडकीस आल्यापासून जिल्हा निबंधक कार्यालयाकडे पाठपुरावा करीत सोसायटीतील गैरव्यवहारप्रकरणी निवेदन देत संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी केली आहे. तसेच संचालकांची चौकशी करुन कारवाईची देखील मागणी केली. पण निबंधक कार्यालयाकडून सध्यातरी कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. परंतु, लाचलुचपतने चेअरमन बनकर यांच्या अटकेच्या कारवाईमुळे सभासदांसमध्ये एकच आनंदाचे उधाण आले आहे. तर जिल्हा निबंधक कार्यालय आता सोसायटी संचालकांविरुद्ध कोणती कारवाई करते, याकडे जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.