Coronavirus Impact : शाळा आणि चित्रपटगृहानंतर दिल्लीतील स्वीमिंग पूल देखील 31 मार्चपर्यंत बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजधानी दिल्लीमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असून या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने शाळा आणि चित्रपटगृह 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांची जलतरण तलावावर गर्दी होत असल्याने या ठिकाणी संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्ली सरकारने आता स्वीमिंग पूल देखील 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोरोना व्हायरसचे रुग्ण वाढत असल्याने दिल्ली सरकारने या आजाराचा सामना करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. सध्या दिल्लीत सफदरजंग आणि आरएमएल ही दोन नोडल रुग्णालय कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत. आरएमएल रुग्णालयतील आयसोलेशन वार्डामध्ये 16 खाटांचा आणि सफदरजंगमधील रुग्णालयात 100 बेडचा वॉर्ड तयार करण्यात आला आहे. संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन दिल्ली सरकारने 25 रुग्णालयामध्ये रुग्णांच्या तपासणीची व्यवस्था केली आहे. जेणेकरून संक्रमण झालेल्या रुग्णावर आयसोलेशन वार्डात तात्काळ उपचार सुरु केले जाऊ शकतात

दिल्ली सरकारने 25 रुग्णालयामध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्याचे आणि 250 बेड तयार ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये 1 सरकारी आणि सहा खासगी रुग्णालयाचा समावेश आहे. या सर्व रुग्णालयांमध्ये तपासणी व नमुने घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी) कर्मचाऱ्यांना स्क्रीनिंग आणि नमुना घेण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये नव्याने आलेल्या रुग्णांना तात्काळ भर्ती करून घेण्यासाठी ट्रॉमा सेंटरमध्ये नवा आसोलेशन वॉर्ड तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

याचबरोबर झज्जर येथील एम्सच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये 125 बेड तयार ठेवण्यात आले आहेत. सध्या आरोग्य विभागाकडून 717 लोकांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यापैकी 291 लोक दिल्लीचे आहेत. सध्या दिल्लीमध्ये दोन ठिकाणी कोरोनाची चाचणी करण्यात येत आहे. त्यामध्ये एम्स आणि दुसरे एनसीडीसीची प्रयोगशाळा आहे.