Coronavirus Impact : दिल्ली मेट्रोची सेवा 31 मार्चपर्यंत बंद, ‘कोरोना’च्या धोक्याच्या पार्श्वभुमीवर मोठा निर्णय

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्ली-एनसीआरमधील कोरोनाचा धोका लक्षात घेता दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने 31 मार्चपर्यंत मेट्रो पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 31 मार्चपर्यंत दिल्ली मेट्रो सेवा कोणत्याही मार्गावर धावणार नाहीत. अशी माहिती दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दिली आहे. कोरोनाच्या धोक्यातून सोडविण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) जनता कर्फ्यू दरम्यान रविवारी मेट्रो सेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

एनसीआरमध्येही दिल्ली मेट्रो सेवा चालणार नाही
गुरुग्राम, गाझियाबाद, नोएडा आणि फरीदाबाद येथेही दिल्ली मेट्रोच्या सेवा बंद राहतील. याशिवाय नोएडा मेट्रोच्या एक्वा लाइनवर चालणारी मेट्रो सेवाही 31 मार्चपर्यंत बंद राहील. दरम्यान, गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत मेट्रो चालू राहिल्याने कोरोनाचा अधिक धोका आहे. अशा परिस्थितीत लोकांच्या आरोग्याचा विचार करता मेट्रो सेवा बंद करण्याचा मोठा निर्णय डीएमआरसीने घेतला आहे.

मेट्रो स्थानकांवरील पार्किंगही बंद
दरम्यान, डीएमआरसीने सोमवारी सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत मेट्रो सेवा बंद करण्याचाही निर्णय घेतला आहे. स्थानकांवरील पार्किंगही बंद ठेवण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी 6 ते 8 या वेळेत 20 मिनिटांच्या अंतराने दिल्ली मेट्रोच्या सर्व मार्गांवर रेल्वेगाडी मिळण्याची माहिती देण्यात आली होती. परंतु आता 31 मार्चपर्यंत पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .