‘वायू’ने दिला हवामान खात्यालाच ‘चकवा’ ; पुन्हा कच्छ दिशेने केली कुच, प्रशासनाची ‘तारांबळ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘वायू’ चक्रीवादळ गुजरातला धडकणार म्हणून केंद्र सरकारसह राज्य सरकारने सतर्कता दाखवून लाखो लोकांना किनाऱ्यापासून दूर हालविले. चक्रीवादळ ज्या भागात धडकणार, तेथील रेल्वेगाड्या, विमान सेवा रद्द केल्या. पण, त्यानंतर ‘वायू’ चक्रीवादळाने आपली दिशा बदलली व ते समुद्राच्या दिशेने वळले. हवामान विभागाने आता धोका टळला, वादळ समुद्रातच शमणार असे जाहीर केले. त्यानंतर आता या चक्रीवादळाने पुन्हा आपली दिशा बदलली असून त्याने समुद्रातून पुन्हा कच्छच्या दिशेने सरकण्यास सुरुवात केली आहे. आता हे चक्रीवादळ १७ – १८ जून रोजी कच्छला धडकण्याची शक्यता हवामान खात्याने जाहीर केले आहे. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.

‘वायू’ चक्रीवादळाने आतापर्यंत अनेकदा आपली दिशा बदलल्याने हवामान विभागाने व्यक्त केलेला त्याचा मार्ग व होणारे परिणाम याविषयी सर्वांनाच संभ्रमात टाकले आहे. ‘वायू’ चक्रीवादळ अरबी समुद्रात निर्माण झाल्यावर ते कोकण किनाऱ्याकडे येत असल्याचे दिसून येत होते. त्यानंतर त्याने दिशा बदलली व ते गुजरातच्या दिशेने गेले. गुजरातमधील पोरबंदर परिसरात ते धडकणार असे हवामान विभागाने जाहीर केले. त्यामुळे गुजरात सरकारने किनारपट्टीवरील लोकांना हलविण्यास सुरुवात केली. त्यानंतर ‘वायू’ आणखी पश्चिमेकडे सरकल्याने तो सौराष्ट्राला धडकेल, असे सांगितले गेले. त्याप्रमाणे त्या भागात उपाय योजना करण्यास सुरुवात केली गेली. त्यानंतर गुरुवारी आता ‘वायू’ समुद्राच्या दिशेने वळला असून तो समुद्रातच शमणार आहे. त्याचा धोका टळला, असे जाहीर केले. त्यामुळे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी गुरुवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतले. त्यानंतर प्रशासनाने सुरक्षित जागा पाठविलेल्या पावणेतीन लाख लोकांना पुन्हा आपल्या घरी परतण्याचे आदेश दिले. आता धोका टळला असून शनिवारपासून शाळा आणि कॉलेजेस पुन्हा नियमितपणे सुरु केल्या जातील. बचाव कार्यासाठी व देखभालीसाठी किनारपट्टीच्या जिल्ह्यात पाठविण्यात आलेल्या वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांना परत येण्याचे आदेश दिले.

त्यानंतर आता ‘वायू’ चक्रीवादळाने शुक्रवारी रात्री पुन्हा आपली दिशा बदलल्याचे व ते कच्छच्या दिशेने येत असल्याचे शनिवारी पहाटे हवामान विभागाने जाहीर केले. त्यामुळे आता गुजरात सरकारला आपले आदेश पुन्हा मागे घेऊन बचाव कार्यासाठी गेलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तेथेच थांबण्याचे आदेश द्यावे लागणार आहेत. याशिवाय कच्छ भागातील किनारपट्टीवरील जिल्ह्यातील नागरिक आपल्या घरी परतले. त्यांना पुन्हा हलविण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

हे चक्रीवादळ शनिवारी सकाळी पोरबंदरपासून २६० किमी, वेरावळपासून ३१० किमी आणि दीवपासून ३६० किमी दूर आहे़ ते १७ किंवा १८ जूनला कच्छ भागाला धडकण्याची शक्यता आहे.

आरोग्य विषयक वृत्त

पावसाळ्यात आरोग्याची घ्या अशी काळजी

सावधान ! चायनीज फूड खाताय ? हे लक्षात असू द्या

‘यकृत’ निरोगी राहण्यासाठी महत्वाच्या टिप्स

Loading...
You might also like