Coronavirus : लक्षणं दिसणार्‍या रूग्णालयातील प्रत्येकाची ‘कोरोना’ चाचणी, नवीन सूचना जारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 258 वर पोहचला आहे. शनिवारी विविध राज्यातून 35 नवे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर आयसीएमआर म्हणजेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने कोरोना चाचणीचे नियम बदलले आहेत. त्यानुसार कोरोनाची लक्षण आढळून येणाऱ्या रुग्णालयातील प्रत्येकाची कोरोना चाचणी होणार आहे. एका किटच्या माध्यमातून ही चाचणी केली जाते, ज्यासाठी आयसीएमआरने नवीन आदेश जारी केले आहेत.

काय आहेत नवीन आदेश ?
या आठवड्यात कोरोना रुग्णांची ज्या वेगाने वाढ होत आहे, त्या पार्श्वभूमीवर आयसीएमआरने चाचणीचे नियम बदलले आहेत. रुग्णालयात भरती असलेले आणि ज्यांना थकवा, श्वास घेण्यास त्रास, ताप, खोकला ही लक्षण आहेत, त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही चाचणी होईल. लक्षण आढळली नसली तरीही पाच दिवस आणि चौदा व्या दिवशी चाचणी केली जाणार आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखणे आणि कोरोनाची लक्षण हे तातडीने स्पष्ट करण्यासाठी नवी नियमावली मदत करणार आहे. आत्तापर्यंत मागील 14 दिवसांत आंतरराष्ट्रीय प्रवास केलेले नागरिक (ज्यांच्यामध्ये लक्षण आढळलेली आणि न आढळलेली), आरोग्य कर्मचारी यांची तपासणी करण्यात आली. देशात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात नवीन 10 रुग्ण आढळून आल्याने राज्यातील करोनाबाधितांची संख्या 63 वर पोहचली.

भारतात आतापर्यंत परदेशातून आलेल्या आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाच कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सामुदायिक संसर्ग (स्टेप-3) झाल्याचे एकही प्रकरण समोर आलेलं नाही. सामुदायिक संसर्ग आढळून आल्यानंतर नवीन सूचना मदत करतील असं आयसीएमआरचं म्हणणं आहे. कोरोना चाचणी बाबतच्या नियमांवर सातत्याने लक्ष असून त्यात आवश्यकते बदल केले जात आहेत.