निर्भया केस : दोषी विनयनं दिल्लीच्या नायब राज्यपालांकडं केली दयेची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया गॅंगरेप आणि हत्या प्रकरणातील दोषींनी फाशीच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी आता नवा मार्ग अवलंबला आहे. आता त्यांनी दिल्लीच्या नायब राज्यपालांकडे फाशीच्या शिक्षेपासून दया द्यावी अशी मागणी केली आहे. दिल्लीच्या न्यायालयाने सर्व दोषींच्या विरोधात चौथ्यांचा डेथ वारंट जारी केले आहे. त्यानुसार 20 मार्चला सकाळी 5.30 वाजता फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे.

आता दोषी विनय शर्माने आपले वकील एपी सिंह यांच्याद्वारे सीआरपीसी सेक्शन 432 आणि 433 अतंर्गत फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. तर पटियाला हाऊस न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मंद्र राणा यांनी या प्रकरणी अनेक अडचणीनंतर चौथ्यांदा डेथ वारंट जारी केले.

याआधी दिल्ली सरकार आणि निर्भयाच्या नातेवाईकांच्या वकीलांनी न्यायालयात सांगितले की दोषींकडे आता कोणताही कायदेशीर पर्याय नाही. परंतु दोषी मुकेशचा भाऊ सुरेश यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुरेश यांनी ही याचिका त्यांचे वकील एम. एल. शर्मा याच्याद्वारे दाखल केली.

शर्मा यांचा आरोप आहे की या प्रकरणात मुकेशच्या न्यायालयाद्वारे नियुक्त वकील वृंदा ग्रोवर यांनी त्याच्यावर दबाव टाकून क्युरेटिव्ही याचिका दाखल केली होती. एम. एल. शर्मा यांच्या मते क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्याची मर्यादा तीन वर्षांची होती, ज्याची माहिती मुकेशला देण्यात आली नव्हती. यामुळे मुकेशला नव्याने क्युरेटिव्ह याचिका आणि दया याचिका दाखल करण्याची संधी दिली जावी. या याचिकेवर 9 मार्चला सुनावणी होईल.