विजयी गुलाल घेण्याचे भाग्य ‘त्यांच्या’ नशिबीच नाही..!

अकोले : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीत विजयी गुलाल अंगावर घेण्याचे भाग्य अकोले तालुक्यातील भाजप सेनेच्या कार्यकर्त्यांना कधीच मिळाले नाही. यंदा भाजप सेनेच्या कार्यकर्त्यांना अंगावर गुलाल घेणे शक्य होते. मात्र नियतीच्या पक्ष बदलाच्या खेळाने हे भाग्य पुन्हा एकदा धुळीस मिळाले.

अकोले तालुक्यात राष्ट्रवादी व पिचड साहेब हे समीकरण म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या. मात्र राष्ट्रवादी पक्षाशी प्रतारणा करून पिचड पिता पुत्र ज्या लोकांनी कायमच विरोध केला त्यांच्या गोटात जाऊन बसले. त्यामुळे पिचडांच्या जीवावर विधानसभा निवडणुकीचा गुलाल यंदा आम्हाला लागेल असा ठाम विश्वास भाजप सेनेच्या कार्यकर्त्यांना होता. मात्र नियतीच्या मनात जरा वेगळेच होते. ज्या भाजप सेनेच्या जीवावर पिचडांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. त्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पिचड पिता पुत्रांचा घात केला.

त्यामुळे 40 वर्षे एकहाती सत्ता असलेल्या पिचड कुटुंबाला या निवडणुकीत चारी मुंड्या चित व्हावे लागले. अकोले तालुक्यातील शिवसेना पक्ष हा दोन क्रमांकाचा बलाढ्य पक्ष आहे. त्या तुलनेत भाजपाची ताकद ही केवळ फुग्या सारखी होती. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा फुगा फुटून लवकरच गारद झाला. या व्यतिरिक्त शिवसैनिकांना पिचडांचा भाजप प्रवेश हा रुचलेलाच नव्हता. त्यामुळे सैनिकांनी पिचडांना साथ दिलीच नाही. याउलट पिचड पिता पुत्र सेनेच्या सेनापतींनाच संपूर्ण शिवसेना समजून बसली. त्यामुळे युतीला जर खरे तडे बसले असतील तर ते निष्ठावान शिव सैनिकांकडूनच !

ज्या पिचडांच्या विरोधात 40 वर्षे लढलो, त्या पिचडांचा निष्ठावान शिवसैनिकांनी प्रचार केलाच नाही. याउलट भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाचाच आमदार होईल, असे म्हणत स्वतःच्या अहंकारापोटी चकनाचूर झाले. कायम विरोधात राहून आपला आमदार कधीच झाला नाही, अशी भावना भाजपा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात होती. त्यामुळे खुद्द पिचड पिता पुत्रच आपल्या ताफ्यात सामील झाले म्हणजे आपला आमदार शंभर टक्के होणार अशी खात्री या पुढाऱ्यांच्या मनात होती. भाजपाचे गटनेते चर्चेदरम्यान सांगायचे की “कैलासराव” पठार भागात कधीच भाजपचा झेंडा फडकला नसता. परंतु पिचडांच्या भाजप प्रवेशाने या भागात माझ्या पक्षाचा झेंडा डौलाने फडकू लागला आहे.मात्र भाजपच्या या नेत्यांचा अति अहंकार देखील सुज्ञ मतदारांनी चांगलाच जिरवला.

असो सांगण्याचे तात्पर्य एकच की, भाजप सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. किरण लहामटेंना खूप चांगल्या पद्धतीने लॉन्च केले. मात्र पिचड “साहेब” आहेत ते काहीही करू शकतात, या भ्रमात राहून या सर्वांनी पक्ष आदेश म्हणा की स्वतःच्या स्वार्थापोटी लहामटे यांना अर्ध्या रस्त्यात सोडून दिले. अर्ध्या रस्त्यात सोडून द्या, त्याचे काही नाही मात्र खाजगीत सीताराम भांगरे, जालिंदर वाकचौरे यांनी डॉ. लहामटेंवर खालच्या पातळीची टीका केली. या सर्व गोष्टीचा विपरीत परिणाम होऊन डॉक्टर लहामटे न भूतो न भविष्यती मताधिक्याने विजयी झाले. यंदा अकोले तालुक्यातील विरोधकांना गुलाल नक्की होता पण त्यांना मिळालेल्या संधीचे सोने करता आले नाही. याउलट असे म्हणता येईल भाजप सेनेचे विरोधक पिचडांच्या गोटात गेल्यामुळे पिचडांचा अधिकच दारुण पाराभव झाला.

पिचड, नवले ठरले शिल्पकार
पिचडांचे पारंपरिक विरोधक असलेले अशोकराव भांगरे व डॉ. अजित नवले हे स्वतःच्या दूरदृष्टीमुळे या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार ठरले.पिचडांसोबत गेलेल्या भाजप सेनेच्या पदाधिकाऱ्यांना कधीच गुलाल लागला नव्हता. मात्र यंदा या दोन्ही नेत्यांनी पिचडांच्या विरोधात बंड पुकारून पहिल्यांदा विधानसभेचा गुलाल आपल्या अंगावर घेतला.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like