आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे कर्मचार्‍याचा बळी गेल्याचा आरोप

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शहराच्या आरोग्याची काळजी घेणार्‍या महापालिकेतील आरोग्य विभागाचा कर्मचारीच डेंग्यूने दगावला असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने महापालिकेच्या आरोग्य विभागाचे पितळ उघडे पडले आहे. आरोग्य विभागाकडून झालेल्या हलगर्जीपणामुळे या कर्मचार्‍याचा बळी गेला असून, संबंधीत विभाग प्रमुखावर कारवाई करण्याची मागणी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली. या मागणीसाठी यशस्विनीच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांची भेट घेऊन निवेदन दिले. तर शहरात आरोग्य सुविधांचा बोजवारा उडल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

यावेळी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे पाटील, जमीला शेख, सुरेखा सांगळे, आरती बडेकर उपस्थित होत्या. महापालिकेच्या कोंडवाडा विभागात मोकाट कुत्रे पकडणारे हंगामी कामगार बाबाजी शिंदे यांचे रविवार दि.25 ऑगस्ट रोजी डेंग्यू या आजाराने मृत्यू झाला. ते आरोग्य विभागात हंगामी कर्मचारी म्हणून कार्यरत होते. गेल्या अनेक दिवसांपासून महापालिकेने कुत्र्यांची आरोग्य नसबंदी केंद्र बंद करून, त्यांच्या ऐवजी मोकाट कुत्रे पकडणे व जीवे मारणे यासाठी हंगामी कर्मचार्‍यांचे नियमबाह्य पद्धतीने नेमणूक केली आहे. या हंगामी कर्मचार्‍यांसाठी कोणत्याही पद्धतीची सुरक्षिततेच्या उपाययोजना व हेल्थ पॉलिसी करण्यात आलेली नाही.

कर्मचार्‍यांना व मोकाट कुत्र्यांपासून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने कोणत्याही प्रकारची सुविधा आरोग्य विभागाकडून पुरविण्यात येत नसल्याचा आरोप यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत बाबाजी शिंदे यांचा डेंग्यू सारख्या आजाराने मृत्यू झालेला आहे. महापालिकेकडून त्यांच्या कुटुंबियांना कुठल्याही प्रकारची भरपाई देण्यात आलेली नाही. त्यांच्या मृत्यूस महापालिकेचे आरोग्य विभागच जबाबदार असून, या विभागातील बेजबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांचे आरोग्य धोक्यात येत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. तसेच तातडीने शहरात साथीचे आजार आटोक्यात आनण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी देखील यावेळी यशस्विनी महिला ब्रिगेडच्यावतीने करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –