…म्हणून भाजपच्या आ. राजळेंविरोधात स्वकीयच एकवटले : पुन्हा उमेदवारी दिल्यास पराभूत करण्याचा इशारा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पाथर्डी – शेवगाव मतदार संघाचे भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात स्वपक्षीय एकवटले आहे. शेवगाव येथे भाजप आणि मित्र पक्षाच्यावतीने कार्यकर्ता मेंळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे, भाजप युवमोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे यांच्यासह भाजप नेते उपस्थित होते. आ. मोनिका राजळे यांच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून त्यांना पुन्हा उमेदवारी दिल्यास पराभूत करण्याचा इशारा जि. प. सदस्य काकडे यांनी दिला आहे.

या मेळाव्यात कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोनिका राजळे यांनी आमदार झाल्यानंतर गेल्या 5 वर्षात कार्यकर्त्यांना डावलून अपमानास्पद वागणूक दिली असल्याचा आरोप करण्यात आला. एवढेच नव्हे तर आगामी विधानसभा निवडणुकीत आ. मोनिका राजळे सोडून अन्य कोणालाही उमेदवारीचे तिकीट द्यावे, अशी मागणी या मेळाव्याच्या भाजप कार्यकर्त्यांच्यावतीने करण्यात आली आहे. आ. मोनिका राजळे यांना पुन्हा तिकीट दिले, तर मोठ्या मताधिक्याने राजळे यांना पराभूत करू, असा इशारा देखील हर्षदा काकडे यांनी यावेळी दिला आहे.

यापूर्वी देखील भाजपच्या शिष्टमंडळाने पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आ. मोनिका राजळे यांच्या उमेदवारीला विरोध केला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आ. राजळे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार की नवीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Visit : Policenama.com