यंदाच्या गणेश मूर्तींत ‘PUBG’ आणि ‘हेल्मेटधारी’ गणपतीचा ‘बोलबाला’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – गोकुळ अष्टमी झाल्यावर पुणेकरांची गणेश मूर्ती बुकिंग व खरेदीसाठी लगबग सुरु होते. दरवर्षी गणपतीच्या मूर्तींचा ट्रेंड वेगवेगळा असतो. दोन वर्षांपूर्वी जय मल्हारच्या रूपातील गणेशमूर्ती, बाहुबलीरूपातील गणेशमूर्ती यांचा ट्रेंड होता. मागील वर्षी कोणत्याही प्रकारच्या मूर्तीचा ट्रेंड नसल्यामुळे पुणेकर गणेशभक्त पुन्हा “ट्रॅडिशनल” प्रकारातील मूर्तींकडे वळले होते. ह्या वर्षी ट्रॅडिशनल मूर्तींबरोबरच ‘PUBG गणपती, हेल्मेटधारी गणपती तसेच मानाच्या गणपतींच्या मूर्तींचा ट्रेंड आहे.

ganesh

शाडूच्या मूर्तींची मागणी वाढली –
विशेष म्हणजे पर्यावरण जनजागृतीमुळे मागील 2-3 वर्षांपासून शाडूच्या मूर्तींची मागणी वाढली असली असून पारंपरिक प्रकरातील मूर्ती घेण्याकडे पुणेकरांचा कल वाढला आहे. जागरूक व सुजाण पुणेकर ‘इको फ्रेंडली’ गणेशोत्सव साजरा करण्यावर भर देऊ लागले आहेत. पर्यावरण पूरक शाडूची मूर्तींबरोबरच मूर्तीला रंगकाम करण्यासाठी नैसर्गिक रंग वापरण्याला पसंती दिली जाऊ लागली आहे. हळद, मुलतानी माती, घेरू यांसारखे नैसर्गिक रंग वापरून मूर्तीना रंगकाम केलेले आहे. 100% नैसर्गिक रंगांच्या गणेश मूर्ती घेण्यावर लोक भर देऊ लागले आहेत. या नैसर्गिक रंगकाम केलेल्या मूर्ती एकाच रंगप्रकारात जरी दिसत असल्या तरी या मूर्तींविषयी क्रेझ निर्माण झालेली आहे. या मूर्तीना बाजारपेठेत वाढती मागणी आहे. हा एक खूप मोठा सकारात्मक बदल आहे.

ganesh

गणेशमूर्तीच्या किमतीत वाढ –
बदलत्या ट्रेण्डबरोबरच ह्यावर्षी मूर्तीच्या किमतीतही बदल झालेला आहे. कच्च्या मालाच्या किमती, मजुरी आणि इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चात झालेली वाढ यामुळे गणेशमूर्तीच्या किमतीत यंदा 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरवर्षी गणेशमूर्तीच्या किमतीत 10 टक्क्यांपर्यंत वाढ अपेक्षित असते. मात्र यंदा कच्च्या मालाच्या किमतीमध्ये मोठी वाढ आणि कुशल कारागिरांच्या मजुरीतही वाढ झाली आहे. वाहतूक खर्चही वाढला आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून यंदा गणेशमूर्तीच्या किमतीत 20 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे एकूणच ह्यावर्षी गणेश मूर्ती भक्तांना थोड्या महागातच मिळतील.