पिचडांच्या प्रवेशामुळे पालकमंत्री राम शिंदेंचा कुमकुवतपणा ‘सिद्ध’ !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – धनगर आरक्षणाचे ‘नंबर एक’ विरोधक असलेले मधुकर पिचड यांना भाजपने पावन करून समाजाचा विश्वासघात केला आहे. या प्रक्रियेत नगरचे पालकमंत्री आणि धनगर नेते राम शिंदे यांनी समाजहितापेक्षा वैयक्तिक स्वार्थाला महत्व दिले, अशी टीका धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ढोणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री राम शिंदे यांनी धनगर आरक्षणासंबंधी खुलासे करण्याची मागणी केली. ढोणे म्हणाले की, धनगर आरक्षणाच्यादृष्टीने नकारात्मक कागदपत्रे मधुकर पिचड यांच्या आदिवासी मंत्रीपदाच्या काळात बनवली गेली आहेत. त्यांनी सातत्याने धनगर आरक्षणाच्या विरोधी टोकाची भुमिका घेतली आहे. गेल्या 5 वर्षात धनगर आरक्षणाचा मुद्दा आला की सरकारला इशारे देण्यात तेच पुढे होते. धनगरांना एसटी आरक्षण दिले, तर मुंबईचा पाणीपुरवठा तोडण्याची धमकी दिली होती.

आदिवासी तरूणांना नक्षलवादी बनवायला भाग पाडू नका, असा इशाराही त्यांनी दिला होता. अशा पिचडांना भाजपने मोठा सन्मान देत भाजपात घेतले आहे. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी पिचडांची स्तुती केली आहे, तर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तर मधुकर पिचड हे सज्जन आहेत, असे सर्टिफिकेट दिले आहे. हा प्रकार धनगर समाजाच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे. या स्वागत सोहळ्याला नगरचे पालकमंत्री राम शिंदे उपस्थित होते.

समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला

एकतर गेली पाच वर्षे भाजप सरकारने धनगरांना टोलवले आहेच, शिवाय आता धनगर आरक्षणाचे ‘नंबर एक’ विरोधक मधुकर पिचड यांना पक्षात घेवून समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. हे होत असताना राम शिंदे काय करत होते, याचा खुलासा त्यांनी करावा. कारण त्यांची प्रत्यक्ष कृती समाजाशी प्रतारणा करणारी आहे. अहिल्यादेवींच्या माहेरचे वंशज म्हणून राम शिंदेंना भाजपने धनगर समाजात प्रोजेक्ट केले. वस्तुत: धनगर समाजाचे संघटन उभारणीत त्यांचे काडीचेही योगदान नाही. मात्र भाजपने त्यांना प्रोजेक्ट करून धनगर मते मिळवली. त्यांना मंत्रीही केले. राम शिंदे हे मुख्यमंत्र्यांचे विश्वासू स्वत:ला मानतात, तसे समाजात सांगतात. प्रदेशाध्यक्ष पदासाठीही त्यांचे नाव अनेकदा आले आहे. इतके ते भाजपचे मोठे नेते आहेत. त्यामुळे धनगर समाजासंबंधीच्या घडामोडींची उत्तरे देणे त्यांना बंधनकारक आहे. मधुकर पिचड हे धनगर आरक्षणाचे कट्टर विरोधक आहेत, हे राम शिंदेंना माहिती आहे. मग भाजपने त्यांना का प्रवेश दिला, भाजपने धनगर आरक्षण विषय सोडून दिला का, त्यांना धनगर समाजाची गरज नाही का, यासंबंधीची उत्तरेही राम शिंदे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील समाजाला द्यावीत.

….ही घटना डोक्याचा संदेश देणारी

भाजप सरकारने गेली पाच वर्षे आऱक्षण दिले नाहीच, शिवाय ‘टिस’चा संशोधन अहवालही जाहीर केला नाही. त्यातच पिचडांचा झालेला भाजपप्रवेश ही धनगर समाजाला धोक्याचा संदेश देणारी घटना आहे. ‘धनगर आरक्षण मिळाले पाहिजे आणि मधुकर पिचड भाजपात नको’ अशी ठाम भुमिका राम शिंदेंनी घ्यायला पाहिजे होती. मात्र त्यांनी तसे केले नाही. स्वत: च्या नेतृत्वाचा कुमकुवतपणा सिद्ध केला. ते भाजपच्या धनगरविरोधी धोरणात सामील झाले आहेत. त्यांनी मधुकर पिचडांचे विचार स्विकारले आहेत, असे आमचे मत बनले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –