International Woman’s Day : मराठमोळ्या नऊवारी साडीत महिला करणार लोहगडाची चढाई, इंडिया ट्रेक्स संस्थेचा उपक्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दरवर्षी ८ मार्च हा जगभरात अंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी या दिवसाचं सेलिब्रेशन वेगवेगळ्या थीमवर ठरलेले असतं. यंदाचा महिला दिन ‘समान जग हे सक्षम जग आहे’ या थीमवर साजरा केला जाणार आहे. याच थीम वर ”इंडिया ट्रेक्स” नावाच्या संस्थेने आंतराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरवले आहे. या दिवशी इंडिया ट्रेक्स संस्थेच्या माध्यमातून १८ ते ६० वयोगटातील ३० महिला पारंपारिक नऊवारी साडीत लोहगड किल्ल्याची चढाई करणार आहेत.

शिवरायांच्या महिलाविषयक धोरणामुळेच संभाजी महाराजांच्या महाराणी येसूबाई, राजाराम महाराजांच्या महाराणी ताराराणी या स्वराज्याच्या रक्षणासाठी निर्भीडपणे पुढे आल्या. त्यांनी घोड्यावर बसून तलवारीने रणांगण गाजविले. सिंहासनावर बसून राज्यकारभार केला. थोडक्यात यंदाच्या महिला दिनाच्या संकल्पनेतून शिवरायांच्या विचारांचे दर्शन होते. शिवरायांच्या महिला विषयक विचारांना वंदन करण्यासाठी नऊवारी साडीत महिलांना लोहगडाची सफर घडवणार असल्याचे इंडिया ट्रेक्सचे सर्वेश धुमाळ यांनी स्पष्ट केले.

नऊवारी साडी परिधान केलेल्या महिला सकाळी ६ वा. लोहगडाची चढाई करण्यास सुरवात करणार आहेत. गडावर पोहचल्यानंतर ३ महिलांना हिरकणी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर व्याख्यानाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती इंडिया ट्रेक्सचे प्रमुख धुमाळ यांनी दिली.